नाशिक : बिटको रुग्णालयाच्या लॅबमध्ये होणार डेंग्यू, चिकुनगुनियाचे निदान | पुढारी

नाशिक : बिटको रुग्णालयाच्या लॅबमध्ये होणार डेंग्यू, चिकुनगुनियाचे निदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उभारलेल्या मॉलिक्युलर लॅबमध्ये आता डेंग्यू, चिकुनगुनियाशी संबंधित चाचण्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात आहे. त्यामुळे या आजाराचे तातडीने निदान होण्यासाठी व रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याच्या हेतूने महापालिकेच्या लॅबमध्येच चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मलेरिया विभागाने वैद्यकीय विभागाला सादर केला आहे.

शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. अस्वच्छता, साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यात शेकडो रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत असते. त्यामुळे काही दिवसांतच शहरातील अनेक ठिकाणी डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात होते. डेंग्यू, चिकुनगुनियाच्या तपासणीसाठी पूर्वी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे रुग्णांचे रक्तनमुने पाठवावे लागत होते. तेथून अहवाल मिळण्यास बराच कालावधी लागत असल्याने, रुग्णांवर उपचारासाठी विलंब व्हायचा. त्यातून अनेकदा निदान न झाल्याने किंवा उपचारात उशीर झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत वर्षी जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर अहवाल प्राप्त होण्याचा वेग वाढला. मात्र, जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत जिल्हाभरातून रक्तनमुने तपासणीसाठी प्राप्त होत असून, तेथून अहवाल मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेनेही साथीच्या आजारांच्या रक्तनमुन्यांची तपासणीकरिता लॅब उपलब्ध करून घेण्याचे शासनाचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या काळात महापालिकेच्या बिटको रुग्णालयात मॉलिक्युलर लॅब उभारण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या साथीच्या आजारांचे निदान या लॅबमार्फत करता येणे शक्य आहे.

त्यासाठी एलायझा टेस्ट किट महापालिकेला खरेदी करावे लागणार आहेत. त्यामुळे मलेरिया विभागाने वैद्यकीय विभागाला पत्र पाठवत डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचे जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले आहे.

वैद्यकीय विभागाकडून चालढकल?
मलेरिया विभागाने यासंदर्भातील पत्र तीन महिन्यांपूर्वीच वैद्यकीय विभागाला दिले आहे. मात्र, वैद्यकीय विभागाने त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. वैद्यकीय विभागाच्या अशा कृतीमुळे डेंग्यू, चिकुनगुनिया हे भविष्यात रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button