

गेवराई : गजानन चौकटे : नगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानंतर मागील काही दिवसांपासून नगरसेवक गायब झाले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आता ते जनतेच्या सेवेसाठी पुन्हा प्रकट होऊ लागल्याचे चित्र शहरातील विविध प्रभागांत दिसून येत आहे. गेवराई नगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबर २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे निवडणूक होऊ शकली नाही.
आता न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक हाेणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आता माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून जोरदार तयारी सुरू केली होती. शहरातील विविध प्रभागातील नगरसेवकांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील जनतेशी संपर्क वाढवला होता. लग्नसोहळे, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जनसंपर्क स्थानिक पातळीवर वाढवण्याचा प्रयत्न केला जात होता.
४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन आठवड्यांत जाहीर करा, असा निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगानेही स्थगित केलेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक, इच्छुक उमेदवार पुन्हा जनतेच्या सेवेसाठी प्रकट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जुलै महिन्यात निवडणूक अपेक्षित धरून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर उन्हात इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधली आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी, म्हणून आपल्या नेत्याच्या संपर्कात इच्छुक उमेदवार राहू लागले असून, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जोतो धडपड करत असताना दिसत आहे.
नगरपालिका निवडणूक सहा महिने पुढे जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर सतर्क राहणारे नगरसेवक, इच्छुक उमेदवार गायब झाले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून विविध माध्यमाचा उपयोग करून आपले काम किती प्रभावी आहे. हे दाखवण्याचा प्रयल पुन्हा सुरू झाला आहे.
नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी पुन्हा एकदा जनसंपर्क वाढवण्यास सुरूवात केली आहे. जुलै महिन्यात निवडणूक अपेक्षित धरून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराई शहरात माजी नगरसेवकांसह निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या नवीन उमेदवारांनी नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
ऐन उन्हाळ्यात निवडणूकचे वातावरण आता तापू लागले आहे. गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण पवार, अमरसिंह पंडित व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित या तिघांचे पॅनल असणार आहे.
शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली असून दि. १० मे ते १४ मेपर्यंत जर कोणत्या व्यक्तीस आक्षेप किंवा हरकत नोंदवण्याची असेल. तर रितसर नगरपालिकेत ती व्यक्ती हरकत नोंदवू शकते. आताच्या प्रभाग रचनेत बदल झाला आहे. ११ प्रभाग व २२ सदस्य राहणार असून पूर्वी ९ प्रभाग व १९ सदस्य होते.
उमेश ढाकणे, मुख्याधिकारी गेवराई
हेही वाचा :