Gunaratna Sadavarte : सदावर्तेंकडून 'एसटी कष्टकरी जनसंघ संघटने'ची स्थापना, एसटी बँकेच्या निवडणुकीतून राजकारणात घेणार एन्ट्री | पुढारी

Gunaratna Sadavarte : सदावर्तेंकडून 'एसटी कष्टकरी जनसंघ संघटने'ची स्थापना, एसटी बँकेच्या निवडणुकीतून राजकारणात घेणार एन्ट्री

मुंबई : पुढारी ऑनलाईन : राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. सदावर्ते यांनी आज ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या आपल्या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना केली आहे. एसटी कर्मचारी यांच्या पाठीमागे शेवटच्या श्वासापर्यंत उभे राहणार असल्याची ग्वाही ॲड. सदावर्ते यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्ताधारी महाविकास आघाडी एसटी कर्मचाऱ्यांचे शोषण करीत आहे, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ९२ हजार एसटी कर्मचारी यांची नवीन युनियन एसटी कष्टकरी जनसंघ या नावाची मी आज घोषणा करत आहे. काही राजकीय नेते असे म्हणतात की, एसटी कामगार हे गिरणी कामगार होणार आहेत. परंतु; तसे काहीही होणार नाही. २०१७ पर्यंत एसटी कामगारांची युनियन या कार्यरत होत्या. व प्रत्येक एसटी कामगाराकडून २०० रुपये नाममात्र वर्गणी घेत होते.
आम्ही आगामी राज्यातील महापालिका निवडणुका या एसटी कर्मचाऱ्यांच्या ताकदीवर लढवणार आहे. पण एसटी कर्मचारी बँकेची निवडणूक नाही. पण आमच्या या नव्या संघटनेची धास्ती मान्यताप्राप्त संघटनेने घेतली आहे. त्यामुळे एसटी बँकेच्या निवडणुकीत आम्ही निर्णायक ठरणार आहोत.

राज्य सरकारवर घणाघाती आरोप करत गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, यापुढे आता कष्टकीर माणसाचे नेतृत्व शेतातील बुजगावण्यांच्या हाती नसेल. कष्टकरी समाज आता स्वत:चीच माणसे निवडतील. आजवर या बुजगावण्यांनी कष्टकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याचे काम केले. आता ही परिस्थीती तशीच राहणार नाही. परिस्थिती नक्की बदलणार आहे. ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेच्या माध्यमातून एसटी बँकेची निवडणूक लढवणार असून आम्ही प्रस्थापितांना  धक्का देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यताप्राप्त संघटना एसटी कामगारांच्या संपुष्टात आलेले असून माझ्यामागे ७५ टक्के लोक माझ्या माझ्याबरोबर आहेत ११५ एसटी कामगार शासन कामावर घ्यायला मागत नाही. या प्रश्नाचे मी उत्तर आता सरकारला विचारत आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा जेल मध्ये असलेले कामगार यांना कामावर घेण्यात सरकार असमर्थ ठरले आहे, म्हणजे सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे. मी स्वतः डेंटल सर्जन असून मला सरकारवर असा आरोप आहे की, सरकार मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान करीत आहे. यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन‌आय‌ए) यांनी आझाद मैदान मध्ये झालेल्या २०१२ दंगलीचा तपास करताना मुख्य आरोपी मोईन मिया व सय्यद नुरी यांना अटक न करता दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हेच दोघे सध्या सरकार मध्ये वावर करताना दिसत आहेत. सरकारचे व यांचे असलेले हितसंबंध व त्यांची बँक अकाउंट तपासले गेल्यास आपल्या सर्व गोष्टी आकलन होतील.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आरोप-प्रत्यारोप करून महाराष्ट्र सरकार अधोगतीला घालवलेले आहे. आमच्या स्टेजवर प्रभू रामचंद्र यांचा फोटो आम्ही या करीता लावलेला आहे की, अयोध्या व बाबरी मशीद या विषयावर सर्वोच्च न्यायालयामध्ये मी व जयश्री पाटील यांनी अखेरपर्यंत लढा दिला आहे. अयोध्येमध्ये राममंदिर व्हावे, याकरिता आम्ही न्यायालयामध्ये लढा दिला होता.

एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात ॲड. सदावर्तेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेच्या माध्यमातून एसटी बँकेच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी विरोधात रणशिंग फुंकणार आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button