यंदा १० दिवसांआधीच मान्सून दाखल होणार! | पुढारी

यंदा १० दिवसांआधीच मान्सून दाखल होणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लाही लाही करणार्‍या उष्म्यात गारवा देणारी एक बातमी हाती आली आहे. ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज व्हेदर फोरकास्ट’नुसार यंदा भारतात मान्सून दहा दिवसांपूर्वीच दाखल होणार आहे. केरळ किनारपट्टीवर 20/21 मे रोजी मान्सून धडकेल. साधारणपणे राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते.

बंगालच्या उपसागरातून हवामानसंबंधी बदलाचे संकेत मिळाले आहेत. अरबी समुद्रातही वावटळरोधी क्षेत्र तयार होत आहे. परिणामी, केरळात मान्सून लवकर दाखल होऊ शकेल. भूमध्य रेषेलगत ढगांचा समूह सक्रिय असून मान्सूनच्या आगाऊपणाचेच हे संकेत आहेत. ‘स्कायमेट’ने मात्र मान्सून आपल्या अपेक्षित वेळेच्या जवळपास दाखल होईल, असाच अंदाज वर्तविलेला आहे. गेल्या 24 तासांत दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबचा काही भाग, बिहार, झारखंड, मणिपूरमध्ये पाऊस झाला. आंध्र प्रदेश, अंदमान निकोबारमध्येही वादळी पाऊस झाला. तेलंगणा, तटवर्ती ओडिशा, मध्य तामिळनाडूतही थोडाफार पाऊस झाला.

हेही वाचलत का ?

Back to top button