पूरग्रस्‍तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर | पुढारी

पूरग्रस्‍तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर

मुंबई : पुढारी ऑनलाईन : पश्‍चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील पुरग्रस्‍तांसाठी राज्‍य सरकारने आज ११ हजार ५०० कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. पुरग्रस्‍तांसाठी देण्‍यात येणार्‍या मदतीची अंमलबजावणी उद्‍यापासून हाेणार आहे.

पश्‍चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग जिल्‍ह्यामध्‍ये अतिवृष्‍टीमुळे हाहाकार माजला. शेतीसह व्‍यापार्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित हानीसुध्‍दा झाली. राज्‍य सरकारने तब्‍बल ११ हजार ५०० कोटींच्‍या पॅकेजला आज राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत मंजुरी दिली, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्‍टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुरग्रस्‍त कुटुंबाना प्रत्‍येकी १० हजार रुपयांची मदत

यावेळी  वडेट्‍टीवार म्‍हणाले, पुरग्रस्‍त कुटुंबाना प्रत्‍येकी १० हजार रुपयांची मदत देण्‍यात येईल. तसेच पूरग्रस्‍त व्‍यापार्‍यांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तर टपरीधारकांना १० हजाराचे अनुदान देण्‍यात येणार आहे.

महापुरामध्‍ये घर पूर्णपणे उद्‍ध्‍वस्‍त झालेल्‍यांना १ लाख ५० हजार रुपये.  घराची ५० टक्‍के पेक्षा अधिक नुकसान झाल्‍यास राज्‍य सरकार ५० हजारांची मदत करणार आहे.

अंशत: नुकसान झालेल्‍या घरांसाठी २५ हजार रुपयांची मदत दिली जाईल, असेही वडेट्‍टीवार यांनी सांगितले.

राज्‍यात अतिवृष्‍टीग्रस्‍त जिल्‍ह्यांमध्‍ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ४ लाख हेक्‍टर शेती बाधित झाली आहे.

मत्‍स्‍य व्‍यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक पॅकेजमध्‍ये दोन्‍ही क्षेत्रांचा समावेश आहे. ग्रामीण विकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २५०० कोटी रुपयांचाही या पॅकेजमध्‍ये समावेश करण्‍यात आल्‍याचेही ते म्‍हणाले.

राज्‍य सरकार आर्थिक पॅकेजची अंमलबजावणी उद्‍यापासून सूरु करणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ : पुराने ओढवलेल्या भयाण परिस्थितीतून जातंय महाड

 

Back to top button