मुंबई : धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी शासकीय परवानगी लागणार | पुढारी

मुंबई : धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी शासकीय परवानगी लागणार

मुंबई/नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 3 मेपर्यंतची मुदत दिली असतानाच सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी नियम तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मनसेला रोखण्यासाठीच राज्य सरकारने हे पाऊल टाकल्याचे समजते. दुसरीकडे मशिदींच्या शंभर मीटर परिघात भोंगे लावण्यासाठी पूर्वपरवानगी न घेतल्यास सरळ तुरुंगवासाची तरतूद करणारा नियम लागू करण्यात आला आहे. राज्यभरात मनसेला रोखण्यासाठी हाच नाशिक पॅटर्न वापरला जाईल, असे स्पष्ट संकेत आहेत.

मनसेने दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी सोमवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोमवारी हा निर्णय जाहीर केला. वळसे-पाटील म्हणाले, प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून निर्णय घेतील. ते नियमावली तयार करतील ती राज्याला लागू केली जाईल. राज्यासाठी अधिसूचना काढली जाईल आणि ही नियमावली लागू करण्यात येईल. हे नियम तोडणार्‍याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

राज्यभरात नाशिक पॅटर्न?

कोणत्याही मशिदीच्या शंभर मीटर परिसरात नवा भोंगा लावण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असा कडक नियम नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सोमवारी लागू केला. त्यापाठोपाठ नवी नियमावली करण्याची घोषणा वळसे-पाटील यांनी केली. भोंग्यांच्या संदर्भात येऊ घातलेली नियमावली ही नाशिक पॅटर्नची असेल, असे स्पष्ट संकेत यावरून मिळतात.नियमानुसार सर्वच धार्मिक स्थळांच्या पदाधिकार्‍यांना भोंग्याबाबतच्या परवानगीसाठी लिखित स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकष व आदेशानुसारच सर्व धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात येणार आहे.

नाशकातील नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबतच्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास 4 महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. 3 मेपर्यंत भोंग्यांसाठी धार्मिक स्थळांनी रितसर शासकीय परवानगी घ्यावयाची आहे. ही तारीख उलटल्यानंतर विनापरवानगी भोंगे वाजविल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

नाशिक परिक्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळांनी आपापल्या मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारावर भोंगा (ध्वनिक्षेपक) बसविण्यासाठी रितसर शासकीय परवानगी घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. परवानगी मिळाल्यानंतरही ठरवून दिलेल्या ‘डेसिबल’मध्येच (ध्वनीचे परिमाण) भोंगे वाजविता येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

नाशिक पोलिसांच्या आदेशात काय?

* मशिदींसमोर हनुमान चालिसा पठणाला कोणत्याही प्रस्थापित प्रथांचा आधार नसून, फक्त सामाजिक तेढ व धार्मिक तंटा निर्माण करण्याच्या हेतूने हा प्रकार होत असल्याचा आमचा कयास आहे.
* धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंग्यांविरुद्ध 3 मेनंतर कारवाई सुरू करण्यात येईल.
* सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अजानसाठी भोंग्यातून आवाजाच्या पातळीचे पालन करणे आवश्यक असेल.
* ज्यांचा या आदेशास विरोध असेल, त्यांनी न्यायालयामार्फत आदेश प्राप्त करून घेतल्यास पोलिसांकडून सुधारित आदेश काढण्यात येईल.
* आदेशांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (1) नुसार संबंधितांवर तडीपारीची कारवाई तसेच विशेष परिस्थितीत प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.

मनसे कार्यकर्त्यांना 100 मीटरमध्ये बंदी

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून नाशिक पोलिसांनी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार मशिदीच्या 100 मीटर परिसरात नमाज अदा करण्यापूर्वी 15 मिनिटे आणि नमाज आटोपल्यानंतर 15 मिनिटांपर्यंतहनुमान चालिसा, भजन, गाणी वा भोंगे वाजविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मनसेने 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटविण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

पर्यावरण मंत्रालयाचे नियम

पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार दिवसा सकाळी सहा ते रात्री 10 या वेळेत व रात्रपाळीत रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेत ध्वनी पातळीची मर्यादा घालून दिली आहे.

औद्योगिक क्षेत्रात रात्री 70 डेसिबल, तर दिवसा 75 डेसिबल. व्यावसायिक क्षेत्रात रात्री 55 व दिवसा 65 डेसिबल. निवासी क्षेत्रात रात्री 45 व दिवसा 55 डेसिबल व शांत क्षेत्रात रात्री 40 डेसिबल व दिवसा 50 डेसिबल क्षमतेपर्यंत परवानगी.

भाजपच्या झेंड्यावरून अचलपुरात संचारबंदी

अचलपूर शहरातील दुल्हागेटवर झेंडा लावण्यावरून रविवारी रात्री दोन गटांत झालेल्या दगडफेकीत नागरिकांसह पोलीस कर्मचारीही जखमी झाले. पोलिसांनी 25 संशयितांना ताब्यात घेतले असून, अचलपुरात संचारबंदी लागू केली आहे. दंगलखोरांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. अचलपूर-परतवाडा शहरात रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पडली होती.

Back to top button