‘मातोश्रीजवळ काही बेकायदेशीर बांधकामे, त्याकडे कानाडोळा करून माझ्या बंगल्यावर कारवाई’ | पुढारी

'मातोश्रीजवळ काही बेकायदेशीर बांधकामे, त्याकडे कानाडोळा करून माझ्या बंगल्यावर कारवाई'

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिकेने शेवटची संधी म्हणून पुन्हा राणे यांना १५ दिवसांची अंतिम नोटीस बजावून कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज (सोमवार) हल्लाबोल केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मंत्री राणे म्हणाले की, जुहू येथील अधिश बंगल्यावर सूड भावनेतून कारवाई करण्यात येत आहे. मातोश्रीजवळ काही बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्याकडे कानाडोळा करून माझ्या बंगल्यावर कारवाई केली जात आहे. परंतु, माझा न्यायालयावर विश्वास आहे. राज्याला मुख्यमंत्री कुठे आहे ? असा सवाल करत अनेक दिवसानंतर मंत्रालयात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांचा कारभार केवळ दोन दिवसांत उरकला. मुख्यमंत्री कट्ट्यावरची भाषणे विधानसभेत करतात, याची मला लाज वाटते, अशी टीका करून आम्ही पण अनेक गोष्टीवरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतो, आम्ही मैदानात लढणारे आहोत, असे ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवरील भोंगे काढण्यास ३ मेरोजीचा अल्टीमेटम दिला आहे. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, बेकायदेशीर भोंगे मशिदीवर का ठेवले आहेत. यावरून दंगली भडकल्या, तर ते आवरण्याची सरकारकडे ताकद नाही. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. दिलीप वळसे- पाटील गृहखाते सांभाळू शकत नाही. आदित्य ठाकरे पिकनिकसाठी अयोध्या दौऱ्यावर जातील, अशी खिल्ली राणे यांनी उडवली.

अभिनेता सुशांतसिंहच्या हत्येवेळी राज्यातील एक मंत्री उपस्थित होता, असा दावा त्यांनी यावेळी केला. राज्य दिवाळखोरीत चाललंय, कोरोना काळात औषधांमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला, असा आरोप करून राज्यातील प्रश्न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. ईडीच्या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊतांचा तोल ढळलाय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका त्यांनी केली. बाळासाहेबांची तुलना कुणाशी करणार नाही, असेही त्यांनी एका प्रश्नावर उत्तर दिले.

दरम्यान, नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यासंदर्भात पालिकेने बजावलेल्या नोटीसला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यात अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा राणे यांनी दिलेला अर्जही अपुऱ्या कागदपत्रांमुळे पालिकेने फेटाळला आहे. त्यामुळे शेवटची संधी म्हणून पुन्हा १५ दिवसाची अंतिम नोटीस बजावून कागदपत्र सादर करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासंदर्भात राणे यांनी पालिकेकडे अर्ज केला होता. त्यानुसार पालिकेने कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र सीआरझेड 2 मध्ये अंतर्गत केलेल्या बांधकामाबद्दल कोणतीही माहिती पालिकेला सादर केली नाही. कागदपत्रांमध्ये वाढीव बांधकामाचा उल्लेख नाही

हेही वाचलंत का ? 

Back to top button