नागपूर : भोंग्यावरून कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपुरात धार्मिक सौहार्द कायम असून शांतता आहे. सर्व संबंधितांशी पोलीस ठाणे स्तरावर चर्चा करण्यात आली आहे. या नंतरही कोणी भोंग्यावरून कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
अनुचित घटना घडल्यास वा कोणी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करू. कायद्यामध्ये असलेली तरतूद आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मशिदी भोंग्यांबाबत नियमांची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. सध्या शहरात शांतता आहे. सर्व धार्मिक आणि सामाजिक नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे. असे काही मुद्दे निर्माण झाल्यास आम्ही नियमाप्रमाणे निराकरण करू, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केल्यानंतर राज्यात हा मुद्दा ज्वलंत झाला आहे. मनसेकडून राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आल्यानंतर गृह विभागाकडून भोंग्यांसंदर्भात नियमावली तयार केली जाणार आहे. मनसेने, भोंगे उतरवले नाही, तर हनुमान चालीसा वाजवण्याचे आव्हान दिले आहे. सध्या राज्यात या मुद्द्यावर चर्चा झडत आहे. त्यातच नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंगे आणि त्यांच्या आवाजासंदर्भात नियमावली जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आयुक्तांनी देखील अलर्ट असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचलंत का ?
- Umran Malik : ‘जम्मू एक्स्प्रेस’ उमरान मलिकच्या भेदक गोलंदाजीची सोशल मीडियावर चर्चा
- सेन्सेक्स १,१७२ अंकांनी घसरून ५७,१६६ वर बंद, गुंतवणूकदारांना २.३६ लाख कोटींचा फटका
- कोरोनाचा धोका कायम : उत्तर प्रदेशमधील सात जिल्ह्यांमध्ये पुन्हा मास्क सक्ती