उद्धव ठाकरे, “… तर भाजप मोहन भागवतांच्या नावापुढे ‘खान’ लिहिणार का?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, पुढारी ऑनलाईन : "पंचायत ते संसदेपर्यंत सर्व आपल्याच ताब्यात ठेवण्याचे भाजपचे धोरण आहे. ही पुढच्या घातक हुकूमशाहीची नांदी असून, त्यास काटशह देणे आवश्यक आहे. भाजपचे हिंदूत्व राजकारणासाठीच असून, शिवसेना मात्र हिंदूत्वासाठी राजकारण करते", असे टीका महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर केली.

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान उद्यापासून सुरू होत आहे. त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे खासदार व संपर्कप्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधला. या अभियानात शिवसेनेचे खासदार, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी गावपातळीवर जाऊन महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. याबाबत पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपवर घणाघाती टीका केली.

आधी करोनाची साथ आणि नंतर शस्त्रक्रियेमुळे मुंबईत अडकून पडलो. पण, पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसैनिक जे एकदा ठरवतो ते करून दाखवतो. युवा सैनिकही बरोबर आहेत. आता महाराष्ट्र काय आहे, हे दिल्लीपर्यंत कळेल. भाजप देशात भ्रमाचे राजकारण करत असून शिवसेनेला हिंदूत्वविरोधी ठरवण्यासाठी त्यांचे नेते विधाने करत असतात. मध्येच आता काही कारण नसताना 'एमआयएम'ने महाविकास आघाडीत येण्याचा विषय काढला. हा भाजपचाच कट आहे", असंही ठाकरे म्हणाले.

"शिवसेनेला हिंदूत्वविरोधी ठरवणारी भाजप काश्मीरमध्ये सत्तेसाठी अफझल गुरूला फाशी नको, म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्तींसह युती करते. त्याचबरोबर काश्मीरमधून पंडितांना हुसकावले जात असताना तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. व्ही. पी. सिंह हे पंतप्रधान झाल्यावर दिल्लीत जामा मशिदीत इमामाला भेटायला गेले तेव्हाही भाजप गप्प बसली. काश्मीरमधील दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा बंद करण्याची धमकी दिल्यानंतर एकट्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मग हज यात्रेसाठी एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा देत दहशतवाद्यांना अंगावर घेतले", याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

"सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीमांबाबतची काही विधाने वाचून दाखवत आता यासाठी भाजप भागवतांच्या नावापुढे खान लिहिणार का? सावरकरांवरून आम्हाला शिकवतात. पण, मोहन भागवतांनीच सावरकर मुस्लीमविरोधी नव्हते, तर त्यांनी उर्दूत गझल लिहिली असे म्हटले आहे. संघाच्या आणि आपल्या विचारात थोडी समानता आहे. पण, आम्ही काही केले तर वाईट आणि ते करतील ते चांगले हे भाजपचे धोरण योग्य नाही", असेही ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "इस्लाम धोक्याच्या धर्तीवर भाजपचे लोक देशात हिंदूत्व धोक्यात असा भीतीचा बागलबुवा उभा करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत. तो दूर करावा लागेल. राज्यपालांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. वर्षभर होऊन गेले तरी विधान परिषदेवर १२ जणांची नियुक्ती केली नाही. हा सरकारचा अधिकार आहे, पण त्यास मंजुरी न देणे हा लोकशाहीचा खून आहे", अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर व भाजपच्या राजकारणावर केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news