Russia-Ukraine war : युक्रेनच्या आर्ट स्कूलवर हल्‍ला, ४०० जण ढिगार्‍याखाली दबले गेल्याची भिती | पुढारी

Russia-Ukraine war : युक्रेनच्या आर्ट स्कूलवर हल्‍ला, ४०० जण ढिगार्‍याखाली दबले गेल्याची भिती

मॉस्को/कीव्ह ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine war) रविवारी 25 व्या दिवशी रशियन फौजांनी युक्रेनमधील एका आर्ट स्कूलवर बॉम्बवर्षाव केला. या इमारतीत 400 जण लपले होते. हे सर्व इमारतीच्या ढिगार्‍याखाली दबले गेल्याची माहिती आहे. दरम्यान, मारियुपोल येथील सर्वात मोठा पोलाद प्रकल्प उद्ध्वस्त झाला असून याशिवाय एक हजार नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका थिएटरवरही हल्‍ला केला.

रशियाने मायकोलाईव्ह येथे हायपरसॉनिक मिसाईल किंझलद्वारे हल्ला केला. अशा पद्धतीचा हा दुसरा हल्ला आहे. दक्षिण युक्रेनमधील एक इंधन साठाही उद्ध्वस्त केल्याचे रशियन सैन्याने सांगितले. स्वित्झर्लंड सरकारने रशियन अब्जाधीशांची संपत्ती जप्‍त करावी, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहे. हा पैसा रशिया युद्धासाठी वापरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. झेलेन्स्कींना चर्चा करावी वाटते, पण पुतीन यांना अद्याप राष्ट्राध्यक्ष पातळीवर चर्चेची वेळ आल्याचे वाटत नाही, असे वक्‍तव्य तुर्कीतर्फे करण्यात आले आहे.

रशियाने आतापर्यंत 1403 एअरस्ट्राईक केले, 459 क्षेपणास्त्रे डागली, असा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. तर अमेरिकेने म्हटले आहे की, रशियाने आतापर्यंत 1080 क्षेपणास्त्रे डागली आहेत. युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष पेत्रो पोरोशेन्को यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना युक्रेन दौर्‍यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. 24 मार्च रोजी नाटो समिटसाठी बायडेन हे ब्रुसेल्स येथे येणार आहेत.

युक्रेनी नागरिकांना केले वेठबिगार (Russia-Ukraine war)

रशियान लष्कराने मारियुपोल येथील 4500 नागरिकांचे अपहरण करून त्यांना वेठबिगार केल्याचा आरोप युक्रेनच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या नागरिकांना रशियाने टॅनोन्रोग या शहरात ठेवले आहे. त्यांचे पासपोर्ट जप्‍त केले. त्यांना वेठबिगारीला जुंपले जाणार आहे. यापूर्वी रशियाने म्हटले होते की, 7800 नागरिकांनी आश्रय मागितला होता. आश्रय मागितलेल्या सर्वांना शक्य ती सर्व मदत देण्याचे प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.

महत्त्वाच्या घडामोडी

रशियाने दुसर्‍या दिवशीही हायपरसॉनिक मिसाईल्सचा मारा केल्याचा युक्रेनचा दावा.
रोममधील रुग्णालयात दाखल केलेल्या 19 स्थलांतरीत बालकांची पोप फ्रान्सिस यांनी भेट घेतली.
युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांमध्ये स्थलांतर केलेल्या जवळपास
15 लाख बालकांची खरेदी-विक्री होण्याचा धोका युनिसेफने व्यक्‍त केला आहे.
मारियुपोल येथील युरोपमधील सर्वात मोठ्या पोलाद उद्योग रशियाने उद्ध्वस्त केला.
युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन नाहीच, पेंटॅगॉनचे स्पष्टीकरण.

Back to top button