

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सेनेला लाचारीबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांची लाचारी 2019 मध्येच दिसली. नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडून आल्यानंतर सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'शिवसंपर्क' अभियानाची सुरुवात करताना भाजपवर सडकून टीका केली. भाजपने सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाशी युती केल्याची, तसेच मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापल्याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. या टीकेला उत्तर देताना, शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
ते म्हणाले, शिवसेना एमआयएमसोबत जाणार का, हा प्रश्नच नाही.सेेनेची वाटचाल त्याच दिशेने आहे. त्यांचे लोक आता 'जनाब बाळासाहेब' म्हणू लागले असून, सेना अजान स्पर्धा घेत आहे. ते 'उर्दू घर' बांधू लागले आहेत. यातच सगळे आले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एमआयएमशी आघाडीचा प्रस्ताव देऊन ठरवून वाद निर्माण करत आहेत. आघाडी झाली नाही तरी त्यांचे विचार एकच आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.