

लखनौ ; हरीओम द्विवेदी : योगी आदित्यनाथ हे 25 मार्च रोजी सलग दुसर्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 24 मार्च रोजी लोकभवन येथे भाजपच्या आमदार गटाची बैठक होईल. ज्यात योगी आदित्यनाथ यांची गटनेतापदी निवडीची औपचारिकता पार पाडली जाईल.
शपथविधी सोहळ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर आता तयारीला वेग आला आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सोहळा होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचाही शपथविधी होईल. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह, केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा सहभागी होतील. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा, बसपा प्रमुख मायावती आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनाही निमंत्रण पाठवले जाणार आहे.
दरम्यान, योगींच्या मंत्रिमंडळावर भाजपच्या 'मिशन-2024'ची छाप दिसून येईल. विविध सामाजिक आणि पूर्व-पश्चिम प्रांतिक समीकरणे साधली जातील. युवक आणि महिलांना चांगला वाटा मिळेल. पक्षाच्या प्रतिमेबाबतही दक्षता बाळगली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 40 ते 45 मंत्री शपथ घेतील. समाधानकारक कामगिरी नसलेल्या जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो.
अनेक नवीन चेहरे मंत्रिपदी दिसू शकतात. राज्यातील 15 कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्य देण्यासह वृद्ध, निराधार महिला, दिव्यांग अशा 1 कोटी लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतनात एक हजारवरून 1500 रुपये अशी वाढ केली आहे. सामूहिक विवाहात मुलींना 51 हजार ऐवजी 1 लाख रुपये दिले जातील.