IPL 2022 : सीएसके संघाचे टेन्शन वाढले, मोईन अलीला मिळेना व्हिसा | पुढारी

IPL 2022 : सीएसके संघाचे टेन्शन वाढले, मोईन अलीला मिळेना व्हिसा

सुरत ; वृत्तसंस्था : 26 मार्चपासून आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिली मॅच चेन्‍नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे मैदानावर होईल. या लढतीला फक्‍त 6 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना सीएसके संघाचे टेन्शन वाढले आहे. संघातील स्टार खेळाडू मोईन अली याला गेल्या 20 दिवसांपासून भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला नाही.

चेन्‍नई संघाचे सीईओ काशी विश्‍वनाथ यांनी सांगितले की, मोईनने 28 फेब्रुवारी रोजी व्हिसासाठी अर्ज केला होता. हा अर्ज करून आता 20 दिवस झाले आहेत. तो नियमितपणे भारतात येतोय, तरीदेखील त्याला आता परवानगी मिळाली नाही. आम्हाला आशा आहे की तो लवकर संघासोबत जोडला जाईल. मोईन अलीने आम्हाला सांगितले आहे की, कागदपत्रे मिळताच मी पुढच्या विमानाने भारतात दाखल होईन. बीसीसीआय या प्रकरणी आमची मदत करत आहे. आशा आहे की त्याला सोमवारी 21 मार्चपर्यंत कागदपत्रे मिळतील.

मोईन अलीने गेल्या वर्षी ऑलराऊंड कामगिरी केली होती. चेन्‍नईच्या चौथ्या आयपीएल विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. 15 सामन्यांत त्याने 357 धावा आणि 6 विकेटस् घेतल्या होत्या. यामुळेच आयपीएल 2022 साठी चेन्‍नईने त्याला 8 कोटींना रिटेन केले होते. आयपीएलमध्ये त्याने 15 सामन्यांत 666 धावा आणि 16 विकेटस् घेतल्या आहेत.

चेन्‍नई सुपर किंग्जने सुरतमध्ये सराव सत्र सुरू केले आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह खेळाडू जोरदार तयारी करत आहेत.

ऋतुराज गायकवाड फिट (IPL 2022)

गतविजेत्या चेन्‍नई सुपर किंग्जला अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. सीएसकेचा सलामवीर ऋतुराज गायकवाड कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्‍वनाथ यांनी ही माहिती दिली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऋतुराजचे मनगट दुखावले गेले होते आणि त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तो बीसीसीआयच्या बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता. त्याने संघासोबत सरावालाही सुरुवात केली आहे.

Back to top button