जपान आगामी ५ वर्षांत भारतात ४२ अब्ज डॉलर गुंतवणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

जपान आगामी ५ वर्षांत भारतात ४२ अब्ज डॉलर गुंतवणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : जपान आगामी पाच वर्षांत भारतामध्ये 42 अब्ज डॉलरची (3.2 लाख कोटी) गुंतवणूक करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. यावेळी विविध क्षेत्रांत द्विपक्षी सहकार्याचा विस्तार करण्याच्या द‍ृष्टीने उभय देशांत सहा करार पार पडले.

14 व्या भारत-जपान शिखर संमेलनाच्या निमित्ताने जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा प्रथमच दिल्ली दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर संयुक्‍त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारत-जपानमध्ये वृद्धिंगत होणार्‍या या संबंधांमुळे केवळ दोन देशांनाच फायदा होणार नाही, तर त्यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, समृद्धी आणि स्थैर्यालाही चालना मिळेल.

या भेटीत युक्रेन संकट, चीन, गुंतवणूक तसेच दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्यासंबंधी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रासंबंधी देखील बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

जपानच्या सागरी सीमेत रशियाच्या हवाई दलासह संयुक्‍त हवाई अभ्यास तसेच सुलु सागर क्षेत्रात फिलिपाईन्सच्या अधिकार क्षेत्रात युद्धनौका पाठवण्यासंबंधी उभय नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. उद्या, 20 मार्चला किशिदा कंबोडिया दौर्‍यावर रवाना होतील.

गुंतवणुकीचा चढता आलेख

2014 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे भारत दौर्‍यावर आले होते. तेव्हा त्यांनी भारतात 3.5 ट्रिलियन येनची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. आता किशिदा यांनी हा आकडा 5 ट्रिलियन येनपर्यंत नेला असून गेल्या 19 वर्षांत भारतात जपानी गुंतवणूक 32 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.

Back to top button