वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा रशियाला पुन्हा एकदा शांती प्रस्ताव | पुढारी

वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा रशियाला पुन्हा एकदा शांती प्रस्ताव

कीव्ह ; वृत्तसंस्था : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी पुन्हा रशियाला शांततेसाठी चर्चा करण्याचे आवाहन केले. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत रशियासमोर प्रस्ताव ठेवला आहे.

आता एकत्र येऊन चर्चा करण्याची वेळ आली आहे. युद्ध सुरूच राहिल्यास इतके नुकसान होईल की त्याची भरपाई करण्यासाठी रशियाच्या अनेक पिढ्या बरबाद होतील, असे झेलेन्स्की यांनी आपल्या व्हिडीओमध्ये सल्ला दिला आहे. झेलेन्स्की म्हणाले, आता प्रत्येकाने माझा सल्ला ऐकावा. विशेषतः रशियाने बोलण्याकडे दुर्लक्ष करू नये. आता भेटण्याची वेळ आहे, एकत्रित चर्चा करण्याची वेळ असून युक्रेनला न्याय आणि अखंडता बहाल करावीच लागेल.

थिएटरवरील हल्ला चिंताजनक : झेलेन्स्की

मारियुपोल शहरातील एक थिएटरवर 16 मार्चला रशियाने हल्ला केला होता. या हल्ल्याबाबत झेलेन्स्की यांनी चिंता व्यक्‍त केली. यावेळी किती नागरिकांचा मृत्यू झाला याची माहिती मिळालेली नाही. हल्ल्यादरम्यान हजारो नागरिकांनी या थिएटरमध्ये आसरा घेतला होता. आतापर्यंत थिएटरमधून 130 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आले असून अजून शेकडो नागरिक थिएटरमध्ये अडकून पडल्याचे वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले.

युक्रेनकडून वॉर क्रॉईम

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या वेळी पुतीन यांनी युक्रेनवर वॉर क्राईमच्या आरोप लावला. पुतीन म्हणाले, रशियाकडून युक्रेनी नागरिकांचा युद्धात मृत्यू होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.

त्यासाठी ह्यूमॅनिटेरियन कॉरिडॉर तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. युद्धातील घटनांची माहिती देऊन युक्रेनकडून वॉर क्राईम केले जात असल्याचे माहिती पुतीन यांनी इमॅन्युअल मॅक्राँ यांना दिली असल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे.

युद्धबंदीसाठी मॅक्राँ यांचे प्रयत्न

युद्ध समाप्‍तीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पुतीन यांनी रशिया आणि युक्रेनकडून युद्धबंदीसाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती पुतीन यांनी मॅक्राँ यांना दिली. युद्धबंदीसाठी मॅक्राँ यांनी पुतीन यांना अनेकवेळा फोन केले आहे. चर्चेच्या माध्यमातून युद्ध थांबवावे, असे मॅक्राँ यांचे म्हणणे आहे.

पुतीन यांची गर्लफ्रेंड अलिनाला स्वित्झर्लंडमधून हाकलण्याची मागणी

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप सुरू आहे. याच दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कथित गर्लफ्रेंड अडचणीत आली असल्याचे समोर आले आहे.

पुतीन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाइवा स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षित असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. दरम्यान, अलिनाला देशातून हाकलून देण्याची मागणी होत आहे. स्वित्झर्लंडमधील काही कार्यकर्त्यांनी एक याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये पुतीन यांच्या गर्लफ्रेंडला देशातून हाकलून लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

अलिना ही पुतीन यांच्या तीन मुलांची आई असल्याचे बोलले जात आहे. एक खेळाडू म्हणून अलिनाच्या नावावर अनेक पदके आणि विक्रमांची नोंद आहे. मात्र पुतीन यांच्याशी नाव जोडल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. पुतीन यांच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे तिला स्वित्झर्लंडकडून आश्रयास नकार दिला जात आहे.

Back to top button