Agriculture: पाणीबचतीचा ‘कारभारवाडी पॅटर्न’ | पुढारी

Agriculture: पाणीबचतीचा ‘कारभारवाडी पॅटर्न’

 जगात तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल असे म्हटले जाते, त्यात काही अंशी तथ्यही आहे. वाढती लोकसंख्या, बदलती पीक पद्धती व ग्लोबल वार्मिंगमुळे होणारे बाष्पीभवन यामुळे भविष्यात लोकांना पाण्यासाठी घसा कोरडा करावा लागणार असे चित्र दिसत आहे.

ऊस पिकासाठी होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर हा टीकेचाच विषय बनला आहे. त्यामुळे राज्यात ठिबक सिंचनाला प्राधान्य देण्याची मोहीम सुरू आहे. मात्र करवीर तालुक्यातील सडोली खालसा पैकी कारभारवाडी या गावाने सात वर्षांपूर्वीच गावातील संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली आणून संपूर्ण राज्याला पाणी बचतीचा महामंत्र दिला आहे. या गावाने शेतीच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या स्वप्नातील आदर्श कृषी ग्राम साकारण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

कारभारवाडी अवघ्या 500 लोकसंख्येची छोटीशी वाडी! गाव तसं राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील आहे. मात्र या गावाने राजकारण बाजूला ठेवून सहकारातून समृद्धीचा विकासाचा नवा मंत्र दिला आहे. या वाडीतील बहुतांशी शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. मात्र गावातील 100 टक्के शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. असा उपक्रम राबवणारे हे राज्यातील पहिलेच गाव आहे, असा ग्रामस्थांचा दावा आहे.

या गावात एकूण 180 एकर क्षेत्र आहे. या क्षेत्राला पारंपरिक पद्धतीनेच पाटाने पाणी दिले जात होते. या गावासाठी 1974 साली खासगी पाणी पुरवठा संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र 2011 साली ग्रामस्थांनी तिचे कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्थेत रूपांतर केले. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नेताजी पाटील यांनी स्वतःच्या शेतीतच ठिबक सिंचनाचा प्रारंभ करून कृषी सिंचनाला नवी दिशा दिली. त्यांनी ग्रामस्थांना घेऊन गोटखिंडी (जि. सांगली) येथील ठिबक सिंचन व्यवस्थेचा बारकाईने अभ्यास केला.

2015 मध्ये गावातील ठिबक सिंचनाची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या टप्प्यातच कारभारवाडीसह सडोली खालसा येथील वीस एकर क्षेत्रात ठिबकद्वारे पाणी पुरवण्यास सुरुवात केली. या योजनेसाठी कारभारवाडी, गाडेगोंडवाडी व सडोली खालसा येथील प्रत्येकी दोन सेवा संस्थाना सहभागी करून घेतले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एक कोटी सोळा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून घेतले. त्यातून गावातील प्रत्येक शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत ठिबक सिंचनाची सुविधा पुरवली. आज यापैकी 80 टक्के कर्ज परतफेड झाले आहे.

केवळ पारंपरिक पद्धतीने ठिबक सिंचन न करता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. केवळ एक माणूस शंभर एकर क्षेत्राला पाणी मोजून देऊ शकतो, हे या गावाने सिद्ध केले आहे. शेतीला शुद्ध पाणी जाण्यासाठी स्वतंत्रपणे शुद्धीकरण गृह उभारले आहे. त्याला तेरा व्हॉल्व्ह बसवले असून एक व्हॉल्व्ह एका वेळी आठ एकर क्षेत्राला पाणीपुरवठा करतो. अर्धा ते दोन तासात दोन व्हॉल्व्हद्वारे दररोज 16 एकर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो.

ही सर्व यंत्रणा कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. ठिबकद्वारे वेगवेगळ्या प्रकारची खते दिली जातात. त्यामुळे स्वतंत्रपणे राबावे लागत नाही. ठिबक सिंचनामुळे गावात पाण्याची मोठी बचत झाली आहे. पाटाच्या पाणी पद्धतीने एक एकराला वार्षिक किमान एक कोटी दहा लाख लिटर पाणी द्यावे लागते. मात्र ठिबक पद्धतीने एकराला केवळ चार ते साडेचार लाख लिटर पाणी लागते. त्यामुळे पाण्याची मोठी बचत होते. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबल्यामुळे मातीचा कस वाढला आहे. खतांमध्ये 50 टक्के बचत झाली आहे. तसेच पिकांच्या अंतर मशागतीचा खर्चही कमी झाला आहे.

पाण्याच्या काटकसरीने व तोलून-मापून वापरामुळे गावातील ऊस उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. पाट पद्धतीच्या पाण्याने एकरी 25 ते 28 ऊस उत्पादन होत होते. मात्र हेच उत्पादन आता एकरी 45 टन वर पोहोचले आहे. त्यामुळे ऊस पिकातून शेतकर्‍यांना किमान 40 ते 50 हजार रुपयांची वाढ झाली आहे. उसाबरोबरच शेतकर्‍यांनी आंतर पिकाला प्राधान्य दिले आहे. भाजीपाला व फुलांचे आंतरपिक म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

आंतरपिकातून एकरी सव्वा ते दीड लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. त्यामुळे या गावाची शेती खर्‍या अर्थाने लक्ष्मी ठरली आहे. ग्रामस्थांनी या माध्यमातूनच आधुनिक शेतीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. शेतकर्‍यांना प्रोजेक्टर व वाचनालयाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे दिले जातात. लागणीसाठी एक डोळा पद्धतीमुळे एकरी केवळ चारशे उसाचे बेणे लागते.

आधुनिक शेतीच्या माध्यमातून महिला सबलीकरणाची मोहीम या गावाने यशस्वीपणे राबवले आहेत. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून गिरणी व तेल घाणा सुरू केला आहे. बचत गटाच्या माध्यमातून ग्रीन हाऊसचा प्रयोग राबवला आहे. शेतकर्‍यांसाठी अवजारांची बँक सुरू केली असून त्यांना नाममात्र भाड्याने शेतीची अवजारे पुरवली जातात. कृषिप्रक्रिया संस्था स्थापन करून भाजीपाला सुकवून विक्री करण्याचे नियोजन आहे.

गुर्‍हाळघराची उभारणी सुरू केली आहे. यातून प्रामुख्याने गुळाच्या पावडरची निर्मिती केली जाणार असून एक किलो पॅकिंगच्या वड्या तसेच चॉकलेटप्रमाणे छोटे छोटे तुकडे उत्पादित केले जाणार आहेत. त्याचबरोबर निर्यातक्षम आयुर्वेदिक काकवीची निर्मिती केली जाणार आहे. पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करता करता या गावाने महिला सबलीकरण व कृषी विकासाच्या माध्यमातून एक समृद्ध कृषी खेडे साकारण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
– राजेंद्र दा.पाटील, कौलव

Back to top button