कर्नाटक : सरस्वती नगरात घर; होनग्यात एटीएम फोडले | पुढारी

कर्नाटक : सरस्वती नगरात घर; होनग्यात एटीएम फोडले

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
गणेशपूरमधील सरस्वतीनगर येथे भरदिवसा घराचा कडी-कोयंडा उचकटून तीन लाखांची चोरी झाली. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळवून नेली आहे. तशी फिर्याद घरमालक चंद्रकांत पाटील यांनी कॅम्प पोलिसांत दिली आहे.

चंद्रकांत पाटील व त्यांची पत्नी सकाळी दहा वाजता घरातून बाहेर पडले. साडेबाराच्या सुमारास त्यांना वरती राहणार्‍या व्यक्तीने फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. घरी जाऊन पाहिले असता समोरील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेल्याचे दिसू आले. यामध्ये साडेतीन तोळ्यांचा नेकलेस, 15 ग्रॅमचे वेगवेगळ्या प्रकारचे तीन जोड कर्णफुले, 10 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 60 ग्रॅमची चांदीची सोनसाखळी व तीन हजाराची रोकड याचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच कॅम्पचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सकाळी 10 ते 12.30 या अवघ्या अडीच तासांत भरदिवसा चोरट्यांनी घर फोडल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. निरीक्षक धर्मट्टी तपास करीत आहेत.

एटीएम फोडून 3 लाख लंपास

होनगा येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले एटीएम फोडून चोरट्यांनी 3 लाख 14 हजारांची रक्कम पळवली. बुधवारी मध्यरात्री ही चोरी घडल्याचा संशय आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच होनगा मुख्य रस्त्यावर इंडिया वन बँकेचे एटीएम आहे. चोरट्यांनी ते फोडून 3 लाख 14 हजाराची रक्कम पळवून नेली आहे. बुधवारी मध्यरात्री अडीच ते 4 या वेळेत ही चोरी घडल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अविनाश ए. वाय, सहायक उपनिरीक्षक नारायण पटवर्धन व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

एटीएममध्ये चोरीपूर्वी चोरट्यांनी येथील सीसीटीव्हीच्या वायरी कापल्या आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजही मिळालेले नाही. चोरटे महामार्गावरून आल्याचा संशय असल्याने इतर सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची शक्यता धूसर आहे. काकती पोलिसांचा तपास सुरू केला आहे.

Back to top button