मुंबई पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे यांची नऊ तास चौकशी करण्यात आल्यानंतर आता नारायण राणेंना पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. जुहू येथील अधीश या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केले असल्याचे असे नोटीसमध्ये म्हटलं आहे.
अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम आणि काही फेरबदल करण्यात आले आहेत. पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर जो गार्डन एरिया आहे तिथे रूम बांधण्यात आली आहे. तिसरा मजला, पाचवा मजला आणि आठवा मजला या ठिकाणी जी गार्डन टेरेसची जागा आहे तो भागही रूम म्हणून वापरला जातो आहे.
चौथा आणि सहावा मजला या ठिकाणी जो टेरेसचा भाग आहे तो देखील रूम म्हणून वापरला जातो आहे. आठव्या मजल्यावर पॉकेट टेरेस आहे तिथेही रूम बांधण्यात आली आहे. टेरेस फ्लोअर, पॅसेजचा भाग हे सगळं रूम म्हणून वापरलं जातं आहे. या सगळ्या बांधकामांबाबत उत्तर द्या, असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
बंगल्यात जे काही बदल करण्यात आले आहेत त्याबाबत मुंबई महापालिकेची संमती घेतली होती का? घेतली असल्यास ती संमती कुठे आहे ? याचीही विचारणा करण्यात आली आहे. रिस्क फॅक्टर म्हणून आम्ही हे बांधकाम तोडू का नये? असाही प्रश्न नाेटीसेमध्ये विचारण्यात आला आहे.
हेही वाचा