Goa Medical College : गोमेकॉत भासतोय औषधांचा तुटवडा | पुढारी

Goa Medical College : गोमेकॉत भासतोय औषधांचा तुटवडा

पणजी : पुढारी प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांना सरकारी इस्पितळात मोफत औषधे पुरवण्यात येत असून इतर राज्यांच्या तुलनेने गोवा हे मोफत उपचार व मोफत औषधे पुरवणारे एकमेव राज्य असल्याचे सांगितले जाते. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे याबाबत अनेकवेळा आपल्या भाषणात उल्लेख करतात. मात्र, बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळासह राज्यातील जिल्हा इस्पितळात व सामाजिक आरोग्य केंद्रात औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या अनेक औषधे बाहेरून खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण होत आहे. बाहेरून औषधे खरेदी करावी लागल्याने रुग्णांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे.

गोमेकॉ व इतर सरकारी इस्पितळातील डॉक्टर तपासणीच्यावेळी किंवा इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांना विविध औषधे लिहून देतात. मात्र, इस्पितळाच्या फार्मसीमध्ये बहुतांश वेळा जास्त महाग असलेली औषधे उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी दिलेल्या यादीतील काही औषधे इस्पितळाच्या फार्मसीत घेऊन इतर औषधे खासगी फार्मसीतून खरेदी करणे भाग पडते. मात्र, ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात त्यांना औषधे खरेदी करणे जमत नाही. गेल्या आठवडाभरात गोमेकॉत औषधांचा साठा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे इस्पितळातील फार्मसीत घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगेत तासन्तास उभे राहिल्यानंतर औषधे नसल्याचे तेथील कर्मचार्‍यांकडून सांगितले जाते. त्यात रुग्णांचा वेळही वाया जात आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने सर्व प्रकारची औषधे मोफत उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button