नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सांस्कृतिक आणि शैक्षणिक म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिक शहरात क्रीडानगरीचाही लौकिक निर्माण व्हावा यादृष्टीने नाशिक महापालिका पंचवटी विभागातील पेठ रोड परिसरात तब्बल 35 एकरांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण उभारणार असून, त्यासाठी 30 कोटींची तरतूद 2022-23 च्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा सुविधांयुक्त असणार्या क्रीडांगणात 25 हजार आसनक्षमतेच्या क्रिकेट स्टेडियमचादेखील समावेश आहे. महापालिकेच्या या प्रकल्पाची जोरदार चर्चा असून, क्रीडाप्रेमींमधून त्याचे स्वागत केले जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून साकार होणारे हे क्रीडांगण उत्तर महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. या स्टेडियममुळे नाशिकचे नावदेखील पुणे, मुंबईबरोबर घेतले जाईल. क्रीडांगणामध्ये क्रिकेट स्टेडियमबरोबरच जलतरण तलाव, अॅथलेटिक्स स्टेडियम आणि इनडोअर खेळांसाठी सुविधा असतील. स्टेडियमचे डिझाइन नाशिकमधील वास्तुविशारद सिनेक्टिक्स आर्किटेक्ट्स कंपनीने केले असून मयूर देवरे, वृषाली कुलकर्णी, जगदीश घोडे, गौरव चव्हाण, कल्याणी गिते, दर्शना मोटकरी, अंकिता पाटील, साक्षी मंडले यांचा यात सहभाग आहे.
स्टेडियमचे आरसीसी सल्लागार डेल्टाकॉम स्ट्रक्चरल कंपनी, तर स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स म्हणून एसबीपीएल डिझाइन्स काम पाहणार आहेत. कंपनीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर स्टेडियमच्या कामांविषयी माहिती दिली आहे. स्टेडियमच्या छताला आधार देण्यासाठी व प्रेक्षकांच्या आसनांना सावली देण्यासाठी कॅन्टिलिव्हर्डसची मालिका तयार केली जाणार आहे. स्टेडियमची रचना करताना सर्व प्रेक्षकांसाठी आरामदायक आसन आणि स्पष्ट दृश्य दिसू शकेल अशीच राहणार असून, स्टेडियमचा आकार हा गोलाकार असेल.