मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई येथे शनिवारपासून केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिलाय. माझा लढा गरीब मराठ्यांसाठी आहे, असे म्हणत संभाजीराजे मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले. ते आझाद मैदान येथून पत्रकार परिषदेत बोलत होते.
सारथीच्या सक्षमीकरणासाठी निधीची मागणी केली जातेय. आम्ही मराठा रक्षणासाठी कोल्हापुरात आंदोलन केले. २०१३ मध्ये लाखोंच्या संख्येनं आंदोलन झाले. १५ दिवसांत मागण्या मार्गी लावण्याचं राज्य सरकारने म्हटलं होतं. सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही. आरक्षण मिळेपर्यंत गरीब मराठा समाजाने काय करायचं? आरक्षण महत्त्वाचं, तेवढ सारथी महत्त्वाचं आहे, असे ते म्हणाले.
आझाद मैदानात मराठा समाज बांधव एकवटला आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणापूर्वी फोर्ट येथील हुतात्मा चौकातील स्तंभांला अभिवादन केले. सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उपोषणस्थळी त्यांचे आगमन झाले. महिलांचीही संख्या या उपोषणाला होती.
'एक मराठा लाख मराठा' च्या घोषणा आणि पांढर्या टोप्या परिधान करून मराठा समाजातील तरुण उपोषणस्थळी दाखल होत होते. उपोषण मंडपात भगवे ध्वज लावण्यात आले होते. या उपोषणाची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी शहरातील प्रमुख चौका-चौकात बंदोबस्त ठेवला होता. आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरही बंदोबस्त होता. उपोषणाला कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव आले आहेत.
राज्य सरकारकडे दीड वर्षांपासून संभाजीराजे मागण्यांसाठी पाठपुरावा करीत होते. मात्र; सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे राज्य सरकार विरोधात एल्गार करण्याचा निर्धार त्यांनी केला.
कोपर्डी प्रकरणातही सरकार उदासीन असल्याचं खा. संभाजीराजे यांनी नमूद केले. एक मागास आयोग असताना दुसरा मागास आयोग करता येतो का, खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न उपस्थित केला.