पुणे ; पुढारी वृत्तसेवा
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. टेलिग्राफ ॲक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बेकायदेशीरपने फोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरू आहे. त्यानंतर शुक्ला यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगाला होता. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शुक्ला सध्या प्रतिनियुक्तीवर केंद्रात कार्यरत आहेत.