कोरोनासंबंधी निर्बंध आणखी शिथिल करा | पुढारी

कोरोनासंबंधी निर्बंध आणखी शिथिल करा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोना महारोगराई जवळपास आटोक्यात आली आहे. या परिस्थितीत केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोनाविषयक निर्बंध आणखी शिथिल करण्याचे निर्देश राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील अर्थकारणांशी संबंधित बाबींना सवलती दिल्या जाऊ शकतात, असे मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक तसेच धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासह नाईट कर्फ्यूचा अवधी कमी करण्याचा सल्ला पत्रातून देण्यात आला आहे.

संपूर्ण स्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्योग आणि अर्थकारणांशी संबंधित व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचा सल्लाही केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी दिला आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उत्सव, सार्वजनिक परिवहन संचालन, शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, जिम, स्पा, रेस्टारंट तसेच बार, शाळा-महाविद्यालये, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांचा उल्लेख पत्रात केला आहे. परवानग्या दिल्यानंतर मास्क घालणे, शारीरिक दुरत्वाच्या नियमाचे पालन, स्वच्छता तसेच बंद खोल्यांमधील खेळत्या हवेसंबंधी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

13,166 कोरोनाग्रस्तांची भर

देशात गुरुवारी दिवसभरात 13 हजार 166 कोरोनाबाधितांची भर पडली. 302 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. 26 हजार 988 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी देशाचा कोरोना मुक्ती दर 98.49 टक्के नोंदवण्यात आला; तर दैनंदिन कोरोना संसर्ग दर 1.28 टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्ग दर 1.48 टक्के नोंदवण्यात आला. दरम्यान, दिल्लीतील सर्व प्रकारचे निर्बंध हटविण्याचा निर्णय दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील रात्रीची संचारबंदीही हटली आहे.

Back to top button