सातारा : तबरेजचा बुलावा अन् किरणचा फायर; मटका किंगचा झाला खेळ खल्लास | पुढारी

सातारा : तबरेजचा बुलावा अन् किरणचा फायर; मटका किंगचा झाला खेळ खल्लास

सातारा : विठ्ठल हेंद्रे

शिरवळ, ता. खंडाळा अपार्टमेंटच्या टेरेसवर रविवारी संजय पाटोळे (वय 31, रा. पुणे) या मटका किंगच्या मर्डरसाठी मोठे प्लॅनिंग शिजल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर येत आहे. मोक्‍कात पसार असणार्‍या तबरेज सुतार याने फोन करुन पाटोळे यांना बोलावून घेतले तर किरण साळुंखे याने गोळी झाडली असून तिघेही मित्र असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पाटोळे यांना टेरेसवरुन ढकलून देवून आत्महत्या दाखवण्याचा कट होता. मात्र तो मारेकर्‍यांवरच बुमरँग झाल्याने ऐनवेळी फायर करत खेळ खल्‍लास केला.
रविवारी सायंकाळी शिरवळ येथील लेक पॅलेसच्या अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय पाटोळे यांच्या नाकावर गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला. शिरवळ व एलसीबी पोलिसांनी पहिल्याच रात्री दणक्यात सहा संशयितांना पकडल्याने पोलिसांची मोहिम फत्ते झाली. संशयितांमध्ये तबरेज कोंडवा पोलिस ठाण्यातील मोक्‍कातील संशयित सहा वर्षांपासून पसार असल्याचे समोर आले.

संशयितांच्या चौकशीमध्ये तबरेज, किरण व संजय पाटोळे हे मित्र आहेत. तबरेज सहा वर्षांपासून पुण्यात मोक्‍का लागल्याने गायब होत कर्नाटक राज्य गाठले. तबरेज पुण्यातील एका गँगशी संबंधित देखील आहे. त्या गँगचा मुख्य म्होरक्या जेलमध्ये आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तबरेज व संजय या दोघांमध्ये धुसफूस सुरु होती. अशातच तबरेजला विष घालून मारणार, अशी ग्रुपमध्ये चर्चा सुरु होती. त्यातूनच तबरेज याने संजय पाटोळे याचा गेम करायचा ठरवला. त्याने स्वत: संजय पाटोळे यांना बोलावून घेतले. याबाबतचे प्लॅनिंग अगोदरच झाले होते. प्लॅनिंगनुसार संजय पाटोळे याला दारु पाजून टेरेसवर घेवून जायचे व तेथून ढकलून देवून त्यांनी आत्महत्या केली, असे भासवायचे ठरले. मात्र प्रत्यक्ष घटनेदिवशी तसे जुळले नाही. कारण संजय तब्येतीने असल्याने त्याला ढकलून देणे शक्य झाले नाही. त्यांना ढकलून देण्याच्या नादात ढकलणारेच पडण्याची भिती निर्माण झाली. ढकलून देण्याचे बुमरँग होत असल्याचे पाहून अखेर किरण याने बंदूक काढून एकच गोळी नाकावर झाडली. गोळी आरपार डोक्यातून गेल्याने संजय पाटोळे गतप्राण झाले.

तबरेजचा ठिय्या हुबळीत?

तबरेज गेल्या सहा वर्षांपासून मोक्‍काच्या गुन्ह्यात पसार आहे. गंभीर गुन्ह्यात कुख्यात गुन्हेगार एवढी वर्षे पसार असताना पुणे पोलिस एवढी वर्षे काय करत होते? तबरेजला पकडल्यानंतर त्याने बहुतेक मुक्‍काम हुबळीत केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्याच्याकडे मोबाईल व मोबाईलच्या बॅटर्‍यांचा खजाना सापडला आहे. यामुळे त्याला आतापर्यंत ‘रसद’ कोणी पुरवली? संजय पाटोळेच्या विरोधातील त्याच्या कोणी संपर्कात होते का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.

खूनाच्या कारणाचे गूढ गुलदस्त्यातच…

गेल्या पाच दिवसांपूर्वी सातारा व पुणे शहर हादरवून सोडणार्‍या खूनाचा गुंता अजूनही सुटलेला नाही. मटका व्यवसाय, मित्र, स्पर्धक असे अनेक कांगोरे समोर येत आहेत. तसेच किरणचे देखील नुकसान झाल्याने तो चिडून होता. यामुळे संजय पाटोळे यांच्या खूनाचे नेमके कारण काय? आणखी संशयित वाढणार का? असे सवाल उपस्थित झाले असून शिरवळ पोलिसांच्या तपासकडे लक्ष लागले आहे.

Back to top button