आनंद सुब्रमण्यम हाच हिमालयातील योगी! | पुढारी

आनंद सुब्रमण्यम हाच हिमालयातील योगी!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) माजी सीओओ आनंद सुब्रमण्यम याला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयने शुक्रवारी दिली.
एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ चित्रा रामकृष्ण हिमालयातील ज्या योगीच्या सल्ल्याने एनएसईशी संबंधित निर्णय घेत होत्या, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आनंद सुब्रमण्यमच असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे.

एनएसई को-लोकेशन घोटाळ्याचा तपास करणार्‍या सीबीआयने चेन्नईत आनंद सुब्रमण्यमची सलग तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, आनंद सुब्रमण्यमने तयार केलेल्या ई-मेल आयडीवर चित्रा रामकृष्ण यांनी गोपनीय माहिती पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. या ई-मेलद्वारे त्यांच्यात संवाद होत होता. यातील काही मेलचे स्क्रीनशॉट सुब्रमण्यमच्या मेलवर आढळून आले आहेत.

त्यामुळे सुब्रमण्यम आणि योगी ही व्यक्ती एकच असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. तत्पूर्वी चित्रा यांनी कथित योगीच्या प्रभावाखालीच आनंदची एनएसईच्या सीओओपदी नियुक्ती केल्याचा ठपका सेबीने अहवालात ठेवला होता. त्यादृष्टीने तपास करीत सीबीआयने गुरुवारी रात्री सुब्रमण्यमला अटक केली.

तो चौकशीत सहकार्य करीत नव्हता, तसेच दिशाभूल करणारी उत्तरे देत असल्याने ही कारवाई करण्यात आली. 2013 मध्ये सल्लागारपदी नियुक्ती केल्यानंतर चित्रा यांनी सुब्रमण्यमला सीओओपद बहाल केले होते. 2016 मध्ये अनियमिततेच्या आरोपानंतर त्याला एनएसईतून बाहेर पडावे लागले होते.

Back to top button