नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक सुरू, मलिकांच्या राजीनाम्याची शक्यता?

Nawab Malik: नवाब मलिक
Nawab Malik: नवाब मलिक
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडी कार्यालयातील आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. दरम्यान, नवाब मलिक यांच्या अटकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित आहेत. ईडीकडून झालेल्या अटकेनंतर मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मलिकांच्या अटकेनंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. दरम्यान, मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समजते. मनी लॉंड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक आज सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. ईडी कार्यालयातील ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. यामुळे महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. मलिकांना अटक झाल्यानंतर ते राजीनामा देणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

दरम्यान, मलिकांच्या अटकेवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मंत्रिमंडळातील सहकारी नवाब मलिक यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रयत्न ईडीच्या माध्यमातून केला जात आहे. अनेकांचे पितळ उघडे पाडल्याचा राग अशा प्रकारे काढणे योग्य नाही. जनता माफ नही करेगी…" असे मुश्रीफ यांनी ट्विट करत म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्याने आता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. गंभीर आरोप किंवा अटक झाल्यास राजीनामा देण्याची या राज्याची परंपरा आहे. त्याचे पालन व्हावे असे त्यांनी सांगितले.

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला आहे. ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

राज्यातील सर्व घोटाळे माहीत असताना मुख्यमंत्री ठाकरे एकही शब्द बोलत नाहीत. राज्यातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार, घोटाळा यावर मुख्यमंत्र्यांना जनतेला उत्तर द्यावे लागले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार माफियांना मदतच करत आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सर्व कारस्थाने आता बाहेर येऊ लागली आहेत. ईडीच्या चौकशीच्या निष्कर्षाची वाट पाहत आहे. नवाव मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही किरीट सोमय्यांनी यांनी म्हटले आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला अटक झाली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news