Nawab malik : महाराष्ट्रातील ‘ईडी’च्‍या कारवाया फडणवीसांच्या सांगण्यावरूनच : नवाब मलिक | पुढारी

Nawab malik : महाराष्ट्रातील 'ईडी'च्‍या कारवाया फडणवीसांच्या सांगण्यावरूनच : नवाब मलिक

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार तपास यंत्रणेचा वापर होत आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांवर दबाव आणला जात आहे. महाराष्ट्रात सक्‍तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाया देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच सुरू आहेत, असा आरोप राज्‍याचे अल्पसंख्यांक विकास खात्याचे मंत्री नबाब मलिक (Nawab malik) यांनी केला.

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या मलिक यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली.

Nawab malik : दुसरे सरकार आणण्यासाठी हालचाली

 या वेळी मलिक म्हणाले की, “महाराष्ट्रात दुसरे सरकार आणण्यासाठी काही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात केंद्रातील भाजपच्या सरकारकडून दबाव आणला जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून ईडीच्या कारवायाही सुरू झाल्या आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर कोणीही हल्ला केला नाही, उलट त्यांना अंगरक्षक घेऊन जात असताना ते पायर्‍यांवरून घसरून पडले आहेत. त्या व्हिडिओतून ते स्पष्ट होत आहे. विनाकारण विरोधकांवर त्याविषयी आरोप केले जातात”.

माजी गृहराज्‍यमंत्री अनिल देशमुख प्रकरणात ईडीचा गैरवापर होत आहे, हेही दिसून आले आहे. परमबीर सिंग यांना भाजपच सांगत असल्याने ते काहीही आरोप करीत आहेत. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे न्यायालयात सत्य काय ते बाहेर येईल, असेही मलिक म्‍हणाले.

लाकडाऊनचे निर्णय पंतप्रधानांचेच

कोरोनाची पहिली लाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘टाळी वाजवा, भांडी वाजवा’, अशा सूचना देण्यात आल्या. त्यांच्याकडेच सर्व सूत्रे होती. त्यामुळे जनता संचारबंदी व लाॅकडाउनचा निर्णय त्यांनीच जाहीर केला हाेता.  ही जबाबदारी पूर्णपणे त्यांचीच हाेती.  त्‍यांनी  लॉकडाऊनविषयी राज्य सरकारांना दोष देणे चुकीचे आहे. ते आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत, असेही मलिक म्हणाले. कोव्हिड विरोधी लसीवर पंतप्रधान यांचे छायाचित्र आहे, त्यामुळे जे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांची जबाबदारी पंतप्रधानांचीच असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Back to top button