Nawab Malik Arrest : मोठी बातमी! नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

Nawab Malik Arrest : मोठी बातमी! नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

मुंबई : पुढारी ऑनलाईन

दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आल्याचे समजते. चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर येत मलिक यांनी झुकेंगे नही लढेंगे अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले.

मनी लॉड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक आज सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. ईडी कार्यालयात ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी चौकशीसाठी मलिकांच्या घरात दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले.

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.

दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक ईक्बाल मिर्ची याच्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने विकास केला होता. पटेल यांच्या कंपनीने येथे सीजे हाऊस नावाची 15 मजली इमारत बांधून मिर्ची फॅमिलीला तिसर्‍या मजल्यावर 9 हजार चौरस फूट आणि चौथ्या मजल्यावर 5 हजार चौरस फूट असे एकूण 14 हजार चौरस फुटांचे बांधकाम दिले होते. ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. तर, याप्रकरणात ईडीने प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे.

ईडीने आतापर्यंत वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील मालमत्तेसह साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, ताडदेवमधील अरुण चेंबसमध्ये असलेले कार्यालय, क्रॉफर्ड मार्केटमधील तीन व्यावसायिक दुकाने, बंगले आणि लोणावळ्यातील 5 एकर पेक्षा अधिक जमीन अशा ईक्बाल मिर्चीच्या तब्बल 600 कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news