कसारा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतूक बंद | पुढारी

कसारा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतूक बंद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली.यामुळे रेल्वे रुळाचं मोठं नुकसान झाले. अंबरनाथ ते लोणावळा आणि टिटवाळा ते इगतपुरी दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी नाशिक आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्‍यान, मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असून, पावसामुळे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.

अधिक वाचा 

कसारा घाटात दरड कोसळल्‍याने रेल्‍वे रुळाचं प्रचंड नुकसान झालं आहे. टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. मात्र, टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंतची रेल्वे वाहतूक सुरू आहे.

अधिक वाचा 

दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर

रेल्वे रुळावरील माती आणि दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यावर नजर ठेवून आहेत. तातडीने रेल्वे वाहतूक सुरू करता यावी, यासाठी दरड हटवण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

दरड कोसळल्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यात सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हुजूर साहेब नांदेड स्पेशल, एलटीटी- गोरखपूर, एलटीटी- हावडा या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा 

याशिवाय काही रेल्वे गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. काही रेल्वे गाड्या दुसऱ्या मार्गांवरून चालवण्यात येणार आहेत.

कल्याण, कसारा आणि इगतपुरी येथे मदत केंद्र सुरू केले आहेत. रेल्वे वाहतूक सुरू होईपर्यंत कसारा, इगतपुरी येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल वाहतूक काही काळ विस्‍कळीत

पश्चिम रेल्वेवर सकाळी 6 वाजता चर्चगेट ते मरीन लाईन्स स्तनकादरम्यान पॉईंट फैल झाला होता. त्यामुळे अप स्लो, डाउन फास्ट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी साडेसात वाजता पॉईंट फैल दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर लोकलची वाहतूक सुरु करण्यात आली.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडिओ :गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

 

Back to top button