कळमोडी धरण १०० टक्के भरले, गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

कळमोडी धरण १०० टक्के भरले, गावांना सतर्कतेचा इशारा

कडुस ; पुढारी वृत्तसेवा : खेडसह आंबेगाव तालुक्यातील आरळा नदीवर असणारे १.५४ टिएमसी क्षमतेचे कळमोडी धरण गुरूवारी (दि. २२) रात्री १ वाजता १०० टक्के भरले. काळमोडी धरण आठही सांडव्याद्वारे रात्री ६९७९ क्यूसेक वेगाने पाणी स्वयंचलित दरवाजाद्वारे आरळा नदीत सोडण्यात आले. पहाटे पावसाचा थोडा जोर कमी झाल्याने ३००० क्युसेक वेगाने पाणी सुरू होते.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषतः कळमोडी धरण परिसरात पडत असणाऱ्या पावसाने मागील २४ तासांत ९४ मिलिमिटर नोंद करण्यात आली.

मुसळधार पावसाने कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे.

धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच असून बुधवारी (दि. २१) सकाळी कळमोडी धरणात ८० टक्के असणाऱ्या साठ्यात एक दिवसांत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली.

कळमोडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढत असून यामुळे आरळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे.
पाण्याचा वेग कमी जास्त होत असून आरळा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम भागांत मागील रविवारपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची संतधार सुरू असून पावसाने धामणगाव, घोटवडी सह परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे कळमोडी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली.

कळमोडी धरण लवकरच पुर्ण क्षमतेने भरल्याने कळमोडी धरणातील सर्व पाणी चासकमान धरणाला मिळत आहे.

खेड सह शिरूर तालुक्याला वरदान ठरणारे चासकमान धरण भरण्यास मदत होणार आहे.

चासकमान धरण परिसरात मागील २४ तासांत ६८ मिलिमिटर नोंद करण्यात आली आहे.

तसेच भिमाशंकर परिसरात ३१३ मि.मी पाऊस झाला आहे.

चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पडत असणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत 3.08 मी. वाढ झाली आहे.

पाणीसाठ्यात 1 टी.एम.सी.वाढ झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस अद्यापही सुरू आहे.

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button