पावसाळ्यात दम्याचा त्रास, अशी घ्या काळजी! | पुढारी

पावसाळ्यात दम्याचा त्रास, अशी घ्या काळजी!

पावसाळा सुरु झाल्यावर ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्यांचे विकार अनेकांमध्ये दिसून येतात. त्यातच दम्याचा विकार असणार्‍यांना या कालावधीत त्रास जाणवतो. अशावेळी श्वसननलिकेला आतमध्ये सूज येते आणि ती आकुंचन पावते. परंतु, वेळीच उपचार झाल्यास श्वसननलिका पूर्ववत करता येते.

याशिवाय दम्याच्या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने या रुग्णांनी कोरोना काळात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

पावसाळ्यातील वातावरणात ओलसरपणा, विषाणू संसर्गामुळे दम्याच्या रुग्णांना होणार्‍या अनेक प्रकारच्या एलर्जीचा त्रास होतो.

आर्द्रतेमध्ये वाढ झाल्याने बुरशीसारखा किंवा दमट वास येऊ शकतो. बुरशी संसर्गामध्ये वाढ होते. घरातील वायू प्रदूषणास आमंत्रण देते. त्यामुळे दम्याचा विकार होऊ शकतो.

सल्फर डाय ऑक्साईड आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड यांसारख्या विषारी वायूदेखील पावसाळ्यात दरम्यात हवेत मिसळल्याने या हानिकारक वायूंमुळे दम्याच्या रुग्णांना योग्यप्रकारे श्वास घेण्यास अडचण येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी दम्याचा अटॅक प्राणघातक ठरू शकतो. तर तरुणांनाही हा दम्याचा त्रास जाणवू शकतो.

पावसाळा सुरू झाला की सर्दी आणि फ्लूमुळे दम्याच्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे.

सध्या दिवसेंदिवस या रुग्णसंख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या रुग्णसंख्येत खूपच वाढ होत आहे. अतिथंड वातावरणामुळे हा दम्याचा विकार सतावू शकतो.

याशिवाय ज्यांना आधीपासूनच दम्याचा त्रास आहे अशा व्यक्ती बुरशी, धूळ आणि बॅक्टेरियाशी संपर्क आल्यास त्यांचा आजार बळावू शकतो.

आपल्या घराला ओलावा, ओलसर भिंती, फर्निचर तपासून बघा. इतर खोल्यांमध्ये ओलावा येऊ नये म्हणून आपले स्नानगृह आणि स्वयंपाकघर कोरडे ठेवा. घरात हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करा.

दम्याचा त्रास टाळण्यासाठी घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करा.

पाळीव प्राण्यांमुळे दम्याची लक्षणे आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यांना खोलीबाहेर ठेवा. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या, घरातील चटई, बेडशीट आणि उशीचे कव्हर गरम पाण्याने धुवा.

अगरबत्ती, धूप स्टिक, डासांपासून बचाव करणारे कॉईल, पर्फ्युम आणि डिओडोरंटचा वापर टाळा. नियमित इनहेलरचा वापर करा. दमा नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या पल्मोनोलॉजिस्टचा वेळोवेळी सल्ला घेणे आवश्यक आहे.

याशिवाय रोगप्रतिकार शक्ती उत्तम करण्यासाठी नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करावे. जंकफुड, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळावेत.

डॉ. विशाल मोरे

Back to top button