सातारा : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील (अंनिस) वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेचा 7 कोटी रुपयांचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना केला आहे.
अविनाश पाटील यांनी म्हटले आहे की, एन. डी. पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक -अध्यक्ष होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. नवीन अध्यक्ष निवडीचा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही. येत्या जून 2022 मध्ये विद्यमान राज्य कार्यकारिणीचा
कालावधी संपत आहे. त्यानंतर संघटनेच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. सरोज पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड हमीद- मुक्ता दाभोलकर स्थापित गटाने केली आहे. या निवडीबद्दल सरोज पाटील यांचे अभिनंदन करतो.
हमीद-मुक्ता गटाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना जे काम करते आहे, त्या कामाचे गपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही या गटाची कार्यपद्धती आहे.
अविनाश पाटील यांनी म्हटले आहे की, समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभ्रम निर्माण करुन फसवणूक करणे आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेची स्थापना शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने दि. 9 ऑगस्ट 1989 रोजी झाली. 1989 ते 2009 पर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते. ते हयात असताना 2010 साली अविनाश पाटील म्हणजे माझी कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यानंतर सलग जवळपास एक तप, 12 वर्षे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आलो आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
अंनिसच्या ट्रस्टसंदर्भात अविनाश पाटील यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. 2013 मध्ये ट्रस्टी झालेल्या अविनाश पाटील यांना त्यांची अकार्यक्षमता आणि ट्रस्टविरोधी कारवायांमुळे ट्रस्टच्या विश्वस्तपदावरून गेल्यावर्षीच काढून टाकले असून, ते अंनिसचे कार्याध्यक्षदेखील नाहीत. अविनाश पाटील यांनी 'विवेक जागर' नावाचा स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आमचे अधिकृत नाव वापरू नये, याची त्यांना समज दिली आहे. ट्रस्टचा व त्यांचा कोणताही कायदेशीर अथवा आर्थिक संबंध नाही, असे स्पष्टीकरण ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार व विश्वस्तांमार्फत दीपक गिरमे यांनी निवेदनाद्वारे दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र' ही नोंदणीकृत न्यासाच्या स्वरूपातील कायदेशीर व आर्थिक रचना डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी सुमारे तीस वर्षापूर्वी स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य या ट्रस्टमार्फत चालते. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हयातीत आणि त्यानंतर देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व आर्थिक व्यवहार हे संबंधित ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामार्फत केले जातात. ट्रस्टच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत प्रतापराव पवार हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ट्रस्टमधील सर्व निर्णय हे चर्चेनंतर सहमतीने घेतले जातात.
या पार्श्वभूमीवर अविनाश पाटील यांनी केवळ वैयक्तिक आकसापोटी 'हमीद व मुक्ता दाभोलकर गटाने अंनिस महाराष्ट्र ट्रस्ट ताब्यात घेतला' अशा स्वरूपाचे जे जाहीर आरोप केले आहेत ते धादांत खोटे आहेत. हे या पत्राच्या माध्यमातून आम्ही जाहीर करू इच्छितो. हमीद आणि मुक्ता दाभोलकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी नाहीत. त्यांनी तसेच एकाही ट्रस्टीने आजअखेर एकदाही एक नवा पैसादेखील ट्रस्टकडून मानधन किंवा प्रवासखर्च किंवा अन्य कारणाने घेतलेला नाही. उलट ट्रस्टसाठी अनेकवेळा पैसे जमा करून दिले आहेत. ट्रस्टचे सातार्यातील कार्यालय देखील दाभोलकर कुटुंबियांनी मोफत वापरण्यास दिलेल्या जागेत चालते. ट्रस्ट चालवल्या जाणार्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सांगली येथे कार्यालय आहे. येथूनच वार्तापत्र निघते. ही जागा सोडता ट्रस्टची कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. त्यामुळे ट्रस्टच्या मालमत्तेवर कुणी ताबा घेतला हे अत्यंत खोडसाळ आणि खोटे आरोप आहेत.
ट्रस्टकडील पैसे जनतेने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी विश्वासाने या ट्रस्टला दिलेले आहेत. ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जागरूकपणे लोकोपयोगी कामासाठी त्याचा विनिमय करत आहे. त्याचे सर्व हिशोब वेळच्या वेळी धर्मादाय कार्यालयाला सादर केले जातात. ट्रस्टकडील निधी हा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी वापरला जातो आणि त्याचा कोणालाही वैयक्तिक लाभ घेता येवू शकत नाही.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ट्रस्टच्यावतीने चालवल्या जाणार्या कार्याचे अध्यक्ष हे मानदपद हे स्थापनेपासून एन. डी. पाटील यांच्याकडे होते. त्यांच्या निधनाने रिक्त झालेले पद हे कार्यकर्त्याशी संवाद करून व अंनिस ट्रस्टच्या संमतीने संघटनेच्या हितचिंतक आणि जेष्ठ कार्यकर्त्या सरोज पाटील यांना स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांनी देखील सर्व पाश्वर्र्भूमी समजून घेवून ते स्वीकारले आहे. ही पूर्णपणे कायदेशीर बाब आहे. त्याच्याशी विवेक जागर ट्रस्टचे अविनाश पाटील यांचा काहीही संबंध नाही.
व्यक्तीकेंद्री नेतृत्वाच्या पलीकडे जावून सामूहिक नेतृत्वाचा एक अभिनव प्रयोग गेले एक वर्ष ट्रस्ट कार्यकर्त्यांसोबत राबवत आहे. यामध्ये राज्य पातळीवर कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, राज्य सरचिटणीस ही सर्व पदे रद्द केली आहेत. त्यामुळे आजमितीस आमच्या समितीचा कोणीही कार्याध्यक्ष नाही. राज्यातील सहा विभागांचे प्रतिनिधत्व करणार्या 15 समकक्ष कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारी समिती ही यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे.
याला मदत आणि मार्गदर्शन करणारे 35 ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे सल्लागार मंडळदेखील स्थापन करण्यात आले आहे. अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामाशी संबंधित 12 उपविभागांचे काम देखील अशाच पद्धतीने 6 लोकांच्या गटाच्या माध्यमातून नियोजन आणि कार्यवाही करून पार पाडले जात असल्याचेही ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार व विश्वस्तांमार्फत दीपक गिरमे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
योग्यवेळी सविस्तर भूमिका मांडणार : हमीद दाभोलकर
अविनाश पाटील यांनी केलेले आरोप हे वैयक्तिक आकसापोटी केले असून, ते धादांत खोटे आहेत. आम्ही अंनिस ट्रस्टचे विश्वस्त नाही. या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवास खर्चदेखील घेतलेला नाही. आम्ही अंनिस चळवळीतील सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू. योग्यवेळी आम्ही आमची भूमिका सविस्तर मांडू, अशी प्रतिक्रिया अंनिसचे कार्यकर्ते व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर व मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी दिली आहे.