पणजी ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज दुपारी गोव्यात दाखल होणार आहेत. फोंडा, वास्को आणि सावर्डे येथे होणाऱ्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (GOA ELECTION 2022)
गोव्यात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार येण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. एका बाजूला पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे. या बंडखोरीमुळे पक्षाच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
राज्यात भाजपसमोर काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि तृणमूल – मगोप युती व अपक्ष आमदार यांचे प्रामुख्याने आव्हान आहे. अमित शहा यांचा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारार्थ हा पहिलाच दौरा आहे. आज दुपारी २.४५ वा. ते दाबोळी विमानतळावरून बोरी येथील श्री साई बाबा मंदिराच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर ३.३० वा. फोंडा येथील सन ग्रेस गार्डनमध्ये जाहीर सभा होईल.
सायंकाळी ५ वाजता सावर्डे मतदारसंघात घरोघरी प्रचारात ते सहभागी होतील. त्यानंतर त्यांची ५.१५ वा. शारदा मंदीर येथे जाहीर सभा होईल. सायंकाळी ७ वाजता ते वास्को येथे
सायंकाळी सात वाजता रेल्वे सभागृहात ते जाहीर सभेला संबोथित करतील आणि एका सभेचे अनेक मतदारसंघात थेट प्रक्षेपण करण्याच्या प्रचार तंत्राचे उद्धाटन करतील. वास्कोतील सभेचे दक्षिण गोव्यातील सर्व मतदारसंघात, प्रत्येक मतदारसंघात पाच ठिकाणी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तेथे उपस्थित मतदार हेही शहा यांच्याशी तेथील प्रणालीचा वापर करून संवाद साधू शकणार आहेत.
स्व, मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पणजीतून, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी सावित्री सांगेतून, इजिदोर फर्नांडिस व विजय पै खोत काणकोणमधून अपक्ष, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रेतून तर दीपक पाऊसकर सावर्डेतून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे शहा या साऱ्यांना जाहीरपणे कोणत्या कानपिचक्या देतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. शहा या साऱ्यांचा उल्लेख देखील न करण्याची रणनिती अवलंबू शकतात. (GOA ELECTION 2022)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, नितीन गडकरी आदी नेते प्रचारासाठी राज्यात येणार आहेत.