Kolhapur BJP : कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट | पुढारी

Kolhapur BJP : कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : “नियंत्रण मंडळ हमारा नाम, प्रदूषण बढाना हमारा काम”, “मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो”, अशा घोषणांनी उद्योग भवन दणाणून सोडत भाजपने टाळा ठोको आंदोलनामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आज (दि.२७) हादरून गेले.  यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी  (Kolhapur BJP) कार्यालयाच्या गेटला कुलूप घालण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. पोलीसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

६ जानेवारी २०२२ रोजी भाजप कार्यकर्त्यांनी, महानगरपालिकेकडे साठलेला व कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात त्याठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने व पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता कचरा टाकल्याचा उल्लेख केला होता.

Kolhapur BJP : भाजपकडून कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या २१ दिवसात प्रदूषण मंडळाने यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे कारवाई न झाल्यास नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार आज विजय जाधव, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजय खाडे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी उद्योग भवनासमोर जमले आणि घोषणा देत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या गेटजवळ अडवले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.

“नियंत्रण मंडळ हमारा नाम, प्रदूषण बढाना हमारा काम”, “मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो”, अशा घोषणा देत उद्योग भवन हादरवून टाकले. त्यानंतर पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी आंधळे व उपविभागीय अधिकारी माने यांना कार्यकर्त्यांना समोर पाचारण केले.

अजून कारवाई का केली नाही

“२१ दिवसांपूर्वी प्रकार उघडकीस आणूनही अजून कारवाई का केली नाही ? पाणी प्रदूषणाची नोटीस दोन दिवसांत देता मग कचऱ्याच्या नोटीसीला इतका वेळ का ? महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी तुमचे लागेबांधे आहेत का ? कचऱ्याचा प्रश्न पाण्या इतकाच महत्वाचा नाही का ? ” अशा संतप्त सवालांनी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

अधिकारी यातील कोणत्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले. त्यातच उपविभागीय अधिकाऱ्यांनी (दि.२४) जानेवारी रोजी महापालिकेस नोटीस पाठवल्याची माहिती दिल्यामुळे, “ही माहिती आंदोलनापूर्वी का दिली नाही? पोलीस यंत्रणेचा वेळ घालवण्यासाठी हे केले काय ? आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच नोटीस कशी निघाली ?” असे प्रश्न विचारत कार्यकर्ते आणखीनच संतप्त झाले.

“विभागीय अधिकारी आल्याशिवाय कोणतेच काम होणार नसेल तर हे कार्यालय असून नसल्यासारखे आहे” असे म्हणत कार्यकर्ते कार्यलायाच्या गेटला कुलूप घालण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. शेवटी पोलीसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळ महानगरपालिकेतील भ्रष्ट व गुन्हेगार अधिका-यांसोबत हात मिळवणी करून कोल्हापूरचे प्रचंड नुकसान करत आहे. त्यामुळे कचरा प्रश्नी जोवर जवाबदार अधिकारी व महानगरपालिकेवर कारवाई होत नाही तोवर अशाच स्वरूपाचे तीव्र आंदोलन भाजप करत राहील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

हेही वाचलं का? 

Back to top button