Padma Awards : आतापर्यंत ३ मान्यवरांनी नाकारला ‘पद्म’ पुरस्कार | पुढारी

Padma Awards : आतापर्यंत ३ मान्यवरांनी नाकारला 'पद्म' पुरस्कार

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : आतापर्यंत तीन मान्यवरांनी केंद्र सरकारकडून दिला जाणारा महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘पद्म’ पुरस्कार (Padma Awards) नाकारला आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य, प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका संध्या मुख्योपाध्याय यांनी सर्वोच्च समजला जाणारा पद्म पुरस्कार नाकारला आहे. त्यांच्यानंतर आता प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांनीही पद्म पुरस्कार नाकारला आहे. आतापर्यंत राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या या ३ व्यक्तींनी पद्म पुरस्कार नाकारला आहे.

पद्मश्री पुरस्कार नाकारण्यासंदर्भात (Padma Awards) माहिती देताना पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी सांगितले की, “मला मंगळवारी (25 जानेवारी) दिल्लीतून पुरस्कार स्वीकारण्याबाबत संमतीसाठी फोन आला. मात्र, मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी धन्यवाद म्हटलं, मात्र करिअरच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्वीकारण्यास तयार नसल्याचं कळवलं. हा पुरस्कार स्वीकारण्याचा टप्पा मी पार केला आहे.”

प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी कोण आहेत?

पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी राष्ट्रपती भवनमध्ये देखील तबलावादन केलं आहे. 1989 मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये सादरीकरण करण्याचा मान मिळालेले ते सर्वात तरूण तबलावादक होते. पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे.

ज्येष्ठ गायिका संध्या मुखोपाध्याय यांनीही नाकारला ‘पद्म’ पुरस्कार

एक दोन दशके नाही तर तब्बल आठ दशके गायन क्षेत्राची सेवा करणाऱ्या ९० वर्षांच्या ज्येष्ठ गायिका संध्या मुखोपाध्याय यांना केंद्राने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. पण, संध्या मुखोपाध्याय यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी हा पुरस्कार नाही. हा पुरस्कार एखाद्या माझ्यापेक्षा कमी अनुभवी अथवा नवख्या कलाकरांसाठी हा पुरस्कार आहे.” मुखोपाध्याय यांची मुलगी सौमी सेनगुप्ता या म्हणाल्या, “जेव्हा दिल्लीतून पुरस्कारासाठी फोन आला होता, तेव्हा माझ्या आईने त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले की, “या वयात मला हा पुरस्कार देऊ करणे म्हणजे मला हा माझा अपमान केल्यासारखे वाटत आहे.”

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नाकारला ‘पद्म’ पुरस्कार

पश्चिम बंगाचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार नाकाराला आहे. त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की, “मला हा पुरस्कार देण्यात येणार आहे, याची कोणतीच कल्पना नव्हती. आणि जर खरंच पद्मविभूषण हा पुरस्कार मला देण्याची घोषणा करण्यात आली असेल तर, मी त्याचा स्वीकार करत नाही.”

हे वाचलंत का? 

Back to top button