Colleges Open : १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार, प्रवेश फक्त ‘लसवंतांनाच’ | पुढारी

Colleges Open : १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार, प्रवेश फक्त 'लसवंतांनाच'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील शाळा सुरू करण्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राज्यातील महाविद्यालयेही ऑफलाइन सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॅम्पसमध्ये प्रवेश देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा आणि सर्व प्रकारची महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात होत असलेले शैक्षणिक नुकसान व कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू निवळत असल्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याचे नुकतेच आदेश दिले होते. सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.

शाळांबाबत निर्णय झाल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याबाबत उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव ठेवला होता. अखेर त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती सामंत यांनी ट्विटरद्वारे मंगळवारी दिली. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करूनच महाविद्यालये सुरू करा, अशी सूचना त्यांनी शैक्षणिक संस्थांना केली आहे.

राज्यात कोरोना निर्बंध लागू असल्यामुळे शाळा व महाविद्यालये ( colleges open ) बंद करण्यात आले होती. कोरानाची स्थिती थोडीशी नियंत्रणात असताना शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यासाठीचा दबाव राज्यसरकारवर वाढत होता. लोकांतून राज्यसरकारने पुन्हा शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याबाबत मागणी होत होती. यापुर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १ फेब्रुवारी पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्य सरकारने १ फेब्रुवारी पासून महाविद्यालये ( colleges open ) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना बाबतची स्थानिक स्थिती पाहून तेथील महाविद्यालये ( colleges open ) सुरु करण्याबाबतचे निर्णय घेण्याच्या सुचना राज्यशासनाने दिल्या आहेत. तसेच दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे आता ज्या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन स्थानिक महाविद्यालयांना महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देऊ शकते. शिवाय ही परवानगी मिळाल्यावर ज्या विद्यार्थ्यांनचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो.

दरम्यान राज्यात ओमायक्रॉनचे संकट वाढू लागल्यानंतर शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका झाली. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु होत असल्याची माहिती दिली होती.

आता याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये ( colleges open ) १ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. स्थानिक कोरोना बाबत स्थिती पाहून तेथील महाविद्यालये सुरु करु शकतात.

Back to top button