बिपीन रावत, प्रभा अत्रेंसह चौघांना पद्मविभूषण; सायरस पुनावाला पद्मभूषण, सुलोचना चव्हाणांना पद्मश्री | पुढारी

बिपीन रावत, प्रभा अत्रेंसह चौघांना पद्मविभूषण; सायरस पुनावाला पद्मभूषण, सुलोचना चव्हाणांना पद्मश्री

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चौघांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण पुरस्काराने १७ जणांना, तर ११७ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. यामध्ये कला, समाजकार्य, जनसेवा, साहित्य, व्यवसाय, वैद्यक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री सन्मान दिले जातात.

महाराष्ट्रातून कला क्षेत्रातून प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सीरमचे सायरस पुनावाला यांना पद्मभुषण पुरस्काराने गौरवण्यात आले. नटराजन चंद्रशेखरन यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जनरल रावत, त्यांची पत्नी आणि इतर अनेक वरिष्ठ आयएएफ अधिकाऱ्यांचा नुकताच हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देशात कोरोनाची स्वदेशी लस विकसित करणाऱ्या हैदराबादस्थित कंपनी भारत बायोटेकच्या मालकांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि मागासवर्गीयांचे मोठे नेते कल्याण सिंह यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा चार पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले असून त्यापैकी तीन व्यक्तींना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आला आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत आणि कल्याण सिंह यांच्याशिवाय साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. खेमका, कल्याण सिंह आणि सीडीएस बिपिन रावत हे तिघेही उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांच्याशिवाय प्रभा अत्रे यांना कलाक्षेत्रातील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

गुलाम नबी आझाद, बुद्धदेव भट्टाचार्य या विरोधी नेत्यांना पद्मभूषण देऊन मोठा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमेरिकेतील मधुर जेफ्री यांचे नाव पद्मभूषण पुरस्कारात समाविष्ट आहे. राजस्थानचे देवेंद्र झाझरिया क्रीडा क्षेत्रात, रशीद खान यूपीच्या कला क्षेत्रात, राजस्थानचे राजीव महर्षी यांना नागरी सेवा क्षेत्रात हा बहुमान मिळाला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही पद्मभूषण देण्यात आला आहे. सायरस पूनावाला यांना महाराष्ट्रातून वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रात पद्मभूषण मिळाले आहे, ते सिरम इन्स्टिट्यूटशी संबंधित आहेत.

Back to top button