

Chhatrapati Shivaji Maharaj CBSE Controversy 68 Words: सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 68 शब्दात देण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधान परिषदेत सत्यजीत तांबे यांनी दिली. हे प्रकरण उपस्थित करताना अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारच्या शिक्षणव्यवस्थेतील उदासीनतेवर ठपका ठेवला.
तांबे म्हणाले की, देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिवरायांचा व्यापक, प्रेरणादायी इतिहास पोहोचत नाही आणि हे सरकार तसेच शिक्षण खात्याचं अपयश आहे. केंद्रीय शाळांच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांसारख्या महान राजकर्त्याचा इतिहास फक्त काही शब्दांत उरकला जातो, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचं त्यांनी म्हटलं.
विधान परिषदेत या मुद्द्यावर अर्ध्या तासाच्या चर्चेची मागणी करताना तांबे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी विविध समाजघटकांना एकत्र आणून बहुजनांच राज्य उभं केलं. आई जिजाऊंनी आणि शाहाजी राजेंनी दाखवलेल्या स्वराज्याच्या स्वप्नाला मूर्त रूप देणाऱ्या राजा विषयी सीबीएसईकडे पुरेशी माहिती नसेल, तर राज्य सरकारने ती देणं गरजेचं आहे.
तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला की, इतका विशाल, प्रेरणादायी आणि असामान्य राज्यकारभार फक्त 68 शब्दांत कसा मावू शकतो? त्याचबरोबर इतर अनेक राजांबद्दल सीबीएसईच्या पुस्तकांत भरपूर मजकूर आहे, पण शिवरायांबाबत मात्र इतकी काटकसर कशासाठी, हा भेदभाव का, असा सवाल त्यांनी केला.
तांबे यांच्या वक्तव्याला सत्ताधारी व विरोधकांनी समर्थन दिलं. सरकारच्यावतीने उत्तर देताना मंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, राज्य शिक्षण मंडळाला एनसीईआरटीचा अभ्यासक्रम थेट बदलण्याचा अधिकार नसला तरी परिषदेनं आवश्यक माहिती एनसीईआरटीला पाठवली असून पुढेही ती पाठवत राहू.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास CBSE च्या इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात केवळ 68 शब्दांत गुंडाळण्यात आला आहे. याबाबत मी मागील अधिवेशनात दिनांक 18 जुलै 2025 रोजी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी माननीय मंत्री महोदयांनी आपण दिल्लीत जाऊन याचा पाठपुरावा करू असा शब्द दिला होता, मात्र अजूनही याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष राजे होते, उत्तम प्रशासक होते, त्यांनी 18 पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारले. भारतीय उपखंडातील इतर राजे, महाराजे भव्य महाल उभारण्यात व्यस्त असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी महाल न उभारता स्वराज्य उभारले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, वृक्षतोड करू नये इतकी दूरदृष्टी त्यांनी आपल्या प्रशासनात पेरली. हा सगळा इतिहास 68 शब्दांत कसा काय मांडला जाऊ शकतो?
जर CBSE ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल पुरेशी माहिती नसेल तर महाराष्ट्र शासनाने स्वतः हा इतिहास लिहून CBSE कडे दिला पाहिजे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली होती, स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते याचा भव्य सोहळाही करण्यात आला, मात्र त्यानंतर या स्मारकाच्या बाबतीत काहीही प्रगती झाली नाही.
संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबाबतही अशीच अक्षम्य दिरंगाई झाली, जिल्हा नियोजन निधीतून हे काम शक्य असताना विनाकारण नगर विकास विभागाकडे हा विषय गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आणण्याची सरकारला संधी होती. मात्र, काही अनाकलनीय कारणास्तव ही रेल्वे शिर्डी मार्गे वळवण्यात आली. जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार होत असताना, त्यांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचे हे उदासीन धोरण दुर्दैवी आहे.