बीड : डाक पार्सलच्या नावाखाली लाखोंच्या गुटख्याची वाहतूक

बीड : डाक पार्सलच्या नावाखाली लाखोंच्या गुटख्याची वाहतूक

परळी, पुढारी वृत्तसेवाः डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमधून लाखोंच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. अशी बनवाबनवी करणार्‍या वाहनाला परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत पकडले आहे. साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर बुधवारी पहाटे पोलिसांनी पकडले.

हरियाणा येथील सरफराज अहेमद दारुद हा त्याच्या ताब्यातील कंटेनर घेवून मंगळवारी पहाटे परळी शहरातील इटके कॉर्नर येथे आले असता पोलिसांनी तो अडवून तपासणी केली. यामध्ये दहा लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या कंटेनरवर डाक पार्सल असे लिहीलेले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिस अशा वाहनाला अडवत नाहीत. परळी पोलिसांनी मात्र मिळालेल्या
माहितीवरुन कंटनेर अडवत तपासणी केल्याने ही बनवाबनवी समोर आली आहे.

या प्रकरणात दारुद याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याच्याकडून सदर गुटखा कोठून आणला, कोठे नेला जात होता, याबाबतची माहिती चौकशीत समोर येऊ शकणार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक एस. एस. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सी.एच. मेढके हे करीत आहेत.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली धुळफेक

राज्यात गुटखाबंदी असतांनाही गल्लीबोळातील टपरी, दुकानावर तो सहज मिळतो. गुटखा बंदी निव्वळ नावालाच राहिली असून नाही म्हणायला पोलिसांकडून अधून मधून कारवाया केल्या जातात. या कारवायांमध्ये जप्त केलेल्या गुटख्याचे आकडे लाखो रुपयात असल्याचेही दिसते.

एकदा पकडलेला गुटखा लाखो रुपयांचा तर यंत्रणेच्या डोळ्यात धुळफेक करुन वाहतूक होणारा गुटखा किती किंमतीचा असेल, याचा अंदाजच केलेला बरा. यातही अत्यावश्यक सेवेच्या वाहनांची तपासणी होत नसल्याची संधी साधत अशा वाहनांमधून वाहतूक होत असल्याचे परळीतील कारवाईवरुन समोर आले. आता यावर कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news