तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने हनी ट्रॅप; 18 लाखांना गंडा | पुढारी

तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने हनी ट्रॅप; 18 लाखांना गंडा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : डेटिंगचा मोह एका उच्च शिक्षिताला चांगलाच महागात पडला आहे. उच्चभ्रू तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून संबंधित व्यक्‍तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्यानंतर चोरट्यांनी तब्बल 18 लाख 37 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. फोटो व्हायरल करून पोलिसांत तक्रार देण्याच्या धमकीने त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले आहेत. फिर्यादी सिंहगड रोड परिसरात राहतो. तो मुंबईतील एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीत मोठ्या पदावर आहे. त्याचे वडील नुकतेच निवृत्त झाले आहेत. 29 मार्च रोजी सायंकाळी त्याला रिना नावाच्या महिलेचा फोन आला. तिने त्याला ‘हॉर्नी डेट’ या कंपनीत तुम्हाला सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईड मेंबरशिप देतो, असे सांगितले. त्यातून तुम्हाला अनेक महिलांबरोबर सहवास मिळेल. त्यांच्याकडून तुम्हाला पैसेही मिळतील, असे आमिष दाखविले. सभासद होण्यासाठी तिने फिर्यादीकडून सुरुवातीला आठशे रुपये भरून घेतले. त्यानंतर रिनाने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर काही तरुणींची छायाचित्रे पाठविली. त्यातील दोन तरुणींचे फोटो फिर्यादीने पसंत असल्याचे सांगितले. फिर्यादी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन केले. वेगवेगळी कारणे सांगून, प्रोफाईल अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरायला लावले. फिर्यादनेदेखील मोहात अडकून आरोपी सांगतील त्याप्रमाणे काही पैसे पाठवले. मात्र, सतत पैशाची मागणी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी वडिलांच्या पेन्शनचे आलेले पैसे असे एकूण 18 लाख 37 हजार 600 रुपये आरोपींच्या हवाली केले.

Back to top button