दुधिवरे खिंडीत दरड कोसळली; लोणावळा- पवनानगर मार्गादरम्यानची घटना | पुढारी

दुधिवरे खिंडीत दरड कोसळली; लोणावळा- पवनानगर मार्गादरम्यानची घटना

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा: लोणावळा आणि पवना धरणक्षेत्रात मागील दोन दिवसांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा आणि पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत दरड कोसळण्याची घटना घडली. मोठ्या प्रमाणात दगड व माती रस्त्यावर आल्याने अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. सुदैवाने या वेळी घटनास्थळी कोणी नव्हते, त्यामुळे दुर्घटना टळली. मागील 24 तासांत लोणावळा शहरात 166 मिलिमीटर तर पवना धरण भागात 98 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दुधीवरे खिंड ही लोणावळा आणि पवना धरण भागाला जोडणारी खिंड असून पवनानगर परिसरातील सर्व गावांना लोणावळ्यात ये-जा करण्यासाठी हा सोयीस्कर मार्ग आहे. लोणावळा भागातून मोठ्या संख्येने पर्यटक पवना धरणाचा जलाशय पाहण्यासाठी जात असतात. त्यावेळी अनेक वेळा पर्यटक या खिंडीमध्ये फोटो काढण्यासाठी थांबत असतात.

सदरची खिंड धोकादायक झाली असून कोणत्याही क्षणी खिंडीच्या डोंगराचे दगड व माती पडू शकते, असे वारंवार सांगितले जात असताना देखील मावळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या या सूचनांकडे कायम कानाडोळा केला. आता दरड पडल्यामुळे रस्ता काही प्रमाणात बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेत सदरचे दगड व राडारोडा बाजुला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा तसेच धोकादाय दगड काढून घ्यावेत अशी मागणी याभागातील नागरिक व प्रवासी करत आहेत.

Back to top button