अर्धवट पत्ते ठरतेय डोकेदुखी; मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्यात अडचण

अर्धवट पत्ते ठरतेय डोकेदुखी; मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्यात अडचण

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला सुपूर्त करण्यात आलेल्या मतदारयाद्यांत मतदारांचे अर्धवट पत्ते आहेत. अनेक मतदारांच्या पुढे राहण्याचा पत्ता म्हणून केवळ परिसराचे नाव आहे. त्यामुळे मतदारयाद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी त्या त्या ठिकाणी जाणार्‍या कर्मचार्‍यांना अपुरा पत्ता डोकेदुखी ठरत आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. याद्यांवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये 4 हजार 273 इतक्या हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत.

या हरकती आणि सूचनांची जागेवर जाऊन महापालिका प्रशासनाकडून पडताळणी केली जात आहे. मात्र, प्रारूप मतदारयाद्यांत मतदारांचे पत्ते हे केवळ परिसराचे नाव आहे. त्यामुळे त्या परिसरातील कोणत्या प्रभागात मतदाराच्या नावाचा समावेश करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे शेजारच्या प्रभागातील नावे इतर प्रभागांत गेली आहेत. अशाच प्रकारच्या त्रुटींवर मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना आल्या आहेत. या हरकती व सूचना घेणार्‍यांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्या-त्या जागेवर जाऊन मतदारयाद्यांमधील त्रुटींची शहानिशा कशी करायची, अपुर्‍या पत्त्यावरील मतदार शोधायचा कसा, असा प्रश्न पथकातील कर्मचार्‍यांना सतावत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.

अंतिम मतदारयादी 16 जुलैला
अंतिम मतदारयादी 9 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार होती. परंतु, हरकती आणि सूचनांची संख्या जास्त असल्याने पडताळणी वेळेत होऊ शकणार नाही. त्यामुळे अंतिम मतदारयादी 16 जुलै रोजी जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्याचेही बिनवडे यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news