

पूर्णा: अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक वाया गेल्याने झालेले आर्थिक नुकसान आणि वैफल्य सहन न झाल्यामुळे पूर्णा तालुक्यातील मरसूळ येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. ही घटना शनिवारी (दि. ४) सकाळी ६:३० ते ६:४५ वाजेच्या सुमारास पूर्णा-अकोला लोहमार्ग रुळावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदू काशिराम शिंदे (वय ६५, रा. मरसुळ, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शिंदे हे अति अल्पभूधारक शेतकरी होते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या नदीकाठच्या शेतातील सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले होते. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शिंदे हे वैफल्यग्रस्त झाले होते. या नुकसानीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न दिसल्याने त्यांनी अखेरीस धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवण्यासारखे अंतिम आणि टोकाचे पाऊल उचलले.
याबाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालुक्यातील मरसूळ येथील अत्यल्पभुधारक शेतकरी चांदू शिंदे हे शनिवारी (दि.४) सकाळी ६ वाजता शेताकडे जातो म्हणून घरातून निघाले. यातच ते अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक संपूर्ण वाया गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले होते. दरम्यान, त्यांनी याच डिप्रेशनमध्ये जावून सकाळी गावालगत असलेल्या पूर्णा-अकोला लोहमार्ग रुळावर वसमतकडून पूर्णेकडे जाणा-या धावत्या रेल्वेसमोर उडी मारुन जीवन संपवले.
सदर घटना कळताच ग्रामस्थांनी ११२ या पोलिस खात्याच्या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी तत्काळ चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनि सुशांत किनगे, जमादार प्रभाकर कच्छवे, मुंडे हे पोलिस कर्मचारी दाखल होत पंचनामा केला. यानंतर मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मयत शेतकरी चांदू शिंदे हे अत्यल्प भूधारक शेतकरी असल्यामुळे वयाच्या साठीनंतरही दररोज मिळेल ती मोलमजुरी करुन घरसंसार चालवायचे. यातच यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचे सोयाबीन पीक पूर्ण वाया गेल्याने ते मागील दहा दिवसांपासून वैफल्यग्रस्त झाले होते, असे नातेवाईक व गावकऱ्यांनी सांगितले. यातच त्यांनी रेल्वे समोर उडी मारुन आपले जीवन संपवल्याने गावासह सकल शेतकरी बांधवात शोककळा पसरली आहे.