भूम, तानाजी सुपेकर
तालुक्यातील मात्रेवाडी गावात अतिवृष्टीने केलेला कहर आता मानवी जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. पावसाचा फटका बसल्याने शेतीचे झालेले नुकसान अन् कर्जफेडीच्या चिंतेने गावातील शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय ४२) यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी परिस्थितीसमोर हतबल होऊन गोठ्यातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
लक्ष्मण पवार यांच्या अडीच ते तीन एकर शेतीपैकी बहुतांशी शेती नदीकाठावर होती. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने त्यांच्या शेतातील माती खरडून गेली. शेतात आता मोठमोठे दगड व वाळू पडली असून पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. कांदा व सोयाबीन पिकांची राखरांगोळी झाल्याने शेती कसण्यायोग्य राहिली नाही. याशिवाय त्यांच्या नावावर दोन ट्रॅक्टरचे कर्ज होते. शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे कर्जफेडीची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता वाढली. गेल्या दोन दिवसांपासून तणावग्रस्त अवस्थेत घरापासूनही ते दूर राहिले. शेवटी त्यांनी जीवन संपवण्याचा मार्ग स्वीकारला.
लक्ष्मण यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुले असा परिवार उरला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच आज सकाळी पुन्हा एकदा झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांच्या घराचा पुढील भिंतीचा भाग कोसळला. अवघ्या पाच दिवसांत कुटुंबाने कर्ता पुरुष व घर गमावले, त्यामुळे पवार कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवन संपवण्याची साखळी थांबवायची असेल तर शासनाने तातडीने मदत करावी, कर्जमाफीसह आधार द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.