

Farmer ends life in Georai
गेवराई : तरूण शेतक-याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१) सकाळी गेवराई शहरातील शिवाजीनगर भागात उघडकीस आली. संतोष महादेव चोपडे (वय ३३, रा. रामपुरी, सध्या रा. गेवराई (शिवाजीनगर) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेचे कारण समजू शकलेले नाही.
दोन एकर शेतजमिनीत कुटुंबियाची उपजीविका होत नसल्याने संतोष याने शेतीवर कर्ज काढून रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यानंतर तो गेवराई शहरातील शिवाजीनगर भागात स्थायिक झाला होता. रिक्षातून मिळत असलेल्या पैशातून तो कुटुंबाचा प्रपंच चालवत असताना बुधवारी सकाळीच त्याचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
कुटुंबीयास मोठा धक्का बसला. दरम्यान, संतोष चोपडे याने मंगळवारी रात्री गळफास घेतल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत संतोष यांने कर्ज घेतल्याची माहिती त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली. मृत संतोष चोपडे याच्या पश्चात्य आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.