

अमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मोर्शी तालुक्यातील शिरखेड गावात कर्जाच्या विवंचनेत अडकलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. संजय पांडुरंग भुजाडे (वय ४५) असे जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मृत संजय भुजाडे यांच्याकडे केवळ दीड एकर शेती होती. सततच्या नापिकीमुळे उदरनिर्वाह कठीण झाल्याने काही महिन्यांपूर्वी त्यांनी अर्धा एकर शेती विकली होती. उरलेल्या शेतात सोयाबीन व कपाशीची पेरणी करण्यासाठी लेहगाव येथील स्टेट बँकेकडून दीड लाखांचे कर्ज घेतले. दोन मुलींच्या शिक्षणासाठी बचत गट व मायक्रो फायनान्स संस्थांकडूनही अतिरिक्त कर्ज घेतले होते.
यावर्षी अवेळी व मुसळधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. दुबार पेरणीनंतरही अतिवृष्टीमुळे पीक पुन्हा नष्ट झाले. त्यामुळे भुजाडे यांच्यावर आर्थिक ताण अधिकच वाढला. घरातील जबाबदाऱ्या, कर्जाचा डोंगर आणि पिकाचे नुकसान या तणावाखाली संजय सतत विवंचनेत होते. शनिवारी (दि. २६) त्यांच्या पत्नी व दोन मुली वैद्यकीय कामासाठी मोर्शी येथे गेल्या असताना संजय यांनी राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. रविवारी (दि. २७) शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि दुपारी शिरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांनी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.