

Malegaon Farmer Death
माळाकोळी: माळेगाव (ता. लोहा) येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने अतिवृष्टी व सतत नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या धास्तीने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना आज (दि. 3) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माळेगाव येथील माधवराव सदाशिव गंगणे (वय 65) यांची चार एकर शेतजमीन आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोहा शाखेतून एक लाख रुपये कर्ज घेतले आहे. मागील आठवड्यात ढगफुटी पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाही नापिकीचे संकट ओढविण्याच्या भीतीने ते नैराश्यात होते.त्यांनी आज शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे अशा मोठा परिवार आहे.
या घटनेची माळाकोळी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत बोंबले अधिक तपास करीत आहेत.