Nanded Hospital death | नांदेडच्या रुग्णालयात २ दिवसांत ३१ मृत्यू कशामुळे?, आरोग्य यंत्रणेचा बोजवारा

Nanded Civil Hospital News
Nanded Civil Hospital News
Published on
Updated on

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या मृत्यूंच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात एका दिवसात २४ मृत्यू झाले होते. सोमवारी रात्रीपासून चार नवजात बालकांसह आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला. येथील मागील दोन दिवसांतील मृतांची संख्या ३१ झाली आहे. (Nanded Hospital death)

संबंधित बातम्या 

कळव्यात एका रात्रीत १८ रुग्ण दगावल्यानंतर उडालेली खळबळ खाली बसत नाही तोच येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्र पुन्हा हादरून गेला. याशिवाय ७० रुग्ण गंभीर असल्याचे रुग्णालय अधिकार्‍यांनीच सांगितले. (Nanded Hospital News)

सुट्ट्यांचा वीकेंड असल्याने सुट्टीवर गेलेले कर्मचारी, बदल्यांमुळे निर्माण झालेली डॉक्टरटंचाई, जीवनावश्यक औषधांचीही टंचाई आणि अशा परिस्थितीत अचानक वाढलेला रुग्णांचा ओघ यामुळे हे बळी गेले असावेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सायंकाळी ५ नंतर रुग्णालयात धाव घेतली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होण्याची ही अलीकडची दुसरी घटना. गेल्याच महिन्यात ठाण्याच्या कळव्यात असेच १८ रुग्ण दगावले होते. त्याचीही चौकशी झाली आणि समस्त डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आली. रुग्ण गंभीर स्थितीमध्येच दाखल झाल्याने ते दगावले, असा निष्कर्ष काढण्यात आला. आता नांदेडच्या या रुग्णबळींचीही चौकशी होऊ घातली आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले असून आरोग्य आयुक्त व संचालकांना तातडीने नांदेडच्या रुग्णालयाला भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ते नांदेडला रवाना झाले आहेत.

सर्पदंशावरील औषधाचा तुटवडा

सर्पदंश झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी हाफकिन संस्थेकडून मिळणारे औषध मागील काही दिवसांपासून नियमितपणे मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावत असल्याचे सांगण्यात आले. औषध पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारीला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी दुजोरा दिला. (Maharashtra Hospital News)

अपुरे मनुष्यबळ

या रुग्णालयाची रोजची ओपीडी साधारणत: दोन हजारांवर आहे. या ठिकाणी नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम अन् शेजारच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. (nanded government hospital)

दहा वर्षांपूर्वी स्थलांतर

सुमारे १० वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे विष्णुपुरी परिसरातील सुसज्ज इमारतीत स्थलांतर करण्यात आले होते. त्यावेळी खाटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रारंभीची काही वर्षे रुग्णांना चांगली आणि तत्पर सेवा मिळत होती. परंतु काही वर्षांपासून रुग्णालयाचे व्यवस्थापन ढेपाळले आहे. रुग्णालयातील वॉर्डांची दुरवस्था झाली असून स्वच्छताही होत नसल्याचे एका जबाबदार अधिकार्‍याने सांगितले. वॉर्डांमधील रुग्णांना वरिष्ठ डॉक्टर्स वेळच्या वेळी बघत नाहीत. कनिष्ठ डॉक्टरांवर रुग्णसेवा सोडून देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. प्रशासन अत्यवस्थ अन् शेवटच्या क्षणी रेफर झालेल्या रुग्णांचा मृतांमध्ये समावेश असल्याचा दावा रुग्णालयाने केला.
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे पूर्वी अधिष्ठाता होते; परंतु आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या जबाबदारीतून ते मुक्त झाल्यानंतर शासनाने त्यांची नियुक्ती मुंबईतच संचालनालयात केली. मधल्या काळात प्रभारी अधिष्ठातांवर कारभार चालविण्यात आला. सध्या डॉ. एस. आर. वाकोडे यांच्याकडे हा पदभार आहे. (Nanded Hospital death)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news