

Manoj Jarange Mumbai protest : "सरकारला आजपासून आठ दिवसांची संधी आहे," असे स्पष्ट करत १५ सप्टेंबरला मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या निर्णयावर आपण ठाम आहोत," असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत जरांगे पाटील म्हणाले की, आता मराठे मुंबईकडे येणार: राज्यात पाऊस सुरू झाल्याने शेतात सध्या कामे उरलेली नाहीत. शेतकऱ्यांसाठी पाऊस आवश्यक होता, तो झाला आहे. त्यामुळे आता शेतकरी आणि मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईतील आंदोलनासाठी मोकळा झाला आहे.
"गणेशोत्सव गेल्या वर्षीही झाला होता आणि पुढेही होईल. हिंदू धर्माचे सण आमच्याइतके श्रद्धेने कोणीही करत नाही. आम्ही सरकारला २०२३ पासून वेळ आणि संधी देत आहोत. परंतु सरकारला फक्त मराठ्यांची मते हवी आहेत, मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत," असा आरोप त्यांनी केला.
भाजप आमदार प्रसाद लाड हे गेल्या सहा महिन्यांपासून या प्रश्नात मध्यस्थी करत आहेत. मात्र, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आंदोलकांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. बावनकुळे हे प्रसाद लाड यांच्या पाठीशी राहून अडचणी निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
"आमच्या सर्व मालमत्ता तुम्ही घ्या, आम्हाला आमचा समाज पोसेल. पण तुम्ही आम्हाला आव्हान देऊ नका, आमचा फटका कसा असतो हे तुम्हाला अजून माहित नाही," असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
निवडणूक येण्यासाठी तुम्हाला जरांगे आणि मराठा समाज लागतो. मागील तीन वर्षे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चांगले बोलत होतो, तेव्हा आवडत होतो. आता मात्र मराठा समाजाच्या हक्काचे मागत असताना विरोध केला, तर तुमच्यासाठी नावडता झालो आहे. मराठा समाजाने आता सावध व्हावे. केवळ मतांसाठी वापर होत आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
१९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करतो. मी कायदा मानतो. मी बेमुदत उपोषणासाठी अर्ज केला आहे. माझे आंदोलन न्यायालयाच्या परवानगीनेच होणार आहे. आता सरकार कायद्याचा मान ठेवत असेल, तर आमच्या आंदोलनाला परवानगी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आता काय व्हायचे ते मुंबईत होईल. मराठा आरक्षण आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी मुंबईत जाऊन मरेन पण फुटणार नाही, असा निर्धार करत मंत्री बावनकुळेंमुळे भाजपचे मोठे नुकसान होणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.