

जालना/अंतरवली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. जालन्यातील अंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना होताना जरांगे यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. "आरक्षणाचा निर्णय घेऊन पप्पांचे उपोषण सोडवा, एखाद्या माणसाचा इतका जीव का बघताय?" असा संतप्त आणि भावनिक सवाल जरांगे यांच्या मुलीने सरकारला विचारला आहे.
उपोषणाचा आज १८ वा दिवस असून जरांगे पाटलांनी सलाईन आणि पाणी दोन्हीही सोडले आहे. त्यांची खालावलेली प्रकृती पाहता कुटुंबीय प्रचंड चिंतेत असून, त्यांच्या या अवस्थेला थेट सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मनोज जरांगे यांच्या पत्नी यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, "सरकार फक्त मागण्या मान्य केल्याचे सांगत आहे. जर खरोखर मागण्या मान्य झाल्या असतील, तर सरकारने स्पष्ट सांगावे की कोणत्या मागण्या पूर्ण केल्या? सरकारने लवकरात लवकर आरक्षण देऊन हे उपोषण मागे घ्यायला भाग पाडावे. उपोषण आणि आंदोलनाची वेळ वारंवार येत आहे, याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडत आहे."
वडिलांच्या संघर्षाला पूर्ण पाठिंबा दर्शवत जरांगे यांचे सुपुत्र शिवराज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "समाजाच्या वेदना पाहून पप्पांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पाणी आणि उपचार सोडले आहेत. मराठा समाजाला रस्त्यावर उतरून लढायला लावणे हे सरकारचे मोठे अपयश आहे. हा जनसमुदाय आणि मराठ्यांचा जनसागर पाहून सरकारने त्वरित जीआर काढून आरक्षणाची अंमलबजावणी करावी. हा जनसागर आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही," असा इशारा शिवराज यांनी दिला.
जरांगे यांच्या मुलीनेही अत्यंत आक्रमक आणि भावनिक भूमिका मांडली. "सरकारने आरक्षण देणार की नाही, हे एकदा स्पष्ट करून टाकावे. तुम्ही सुद्धा एका मुलीचे वडील आहात; तुम्हाला जर मुलीच्या भावना समजत असतील, तर पप्पा मुंबईत पोहोचण्यापूर्वीच निर्णय घ्या. पप्पांनी दिलेला शब्द ते कधीही मागे घेत नाहीत, हे त्यांचे शेवटचे उपोषण असेल आणि ते आरक्षण मिळवूनच परततील," असा ठाम विश्वास तिने व्यक्त केला.